संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार कॉ.संपत देसाई यांना जाहीर

163
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवली, ता.5 : सिंधुदुर्गच्या पत्रकारितेत अनेक वर्षे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा 2019 सालचा ‘कबीर’ वाड:मय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. आजरा येथील ‘आधी पुनर्वसन नंतरच धरण’ या यशस्वी लोकलढ्याचेकर्ते कॉ.संपत देसाई यांच्या शब्द पब्लिकेशन बोरीवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या ग्रंथाला तो जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्काराने श्री देसाई यांना जुलै मध्ये आजरा येथे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थित गौरविण्यात येणार आहे.
संजय कांबळे हे परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या परिवारातर्फे यंदा पासूनच देण्यात येणार्‍या कबीर पुरस्कारासाठी कादंबरी, कथा, कविता, समीक्षा आणि चळवळीतील कार्यकर्त्याचे कृतिशील लेखन आदी ग्रंथापैकी मागील चार वर्षातील एका उत्कृष्ट ग्रंथाची निवड करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे या पुरस्काराने पुरस्कारप्राप्त लेखकाला त्याच्या गावी जाऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्कारासाठी धरणग्रस्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री देसाई यांच्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या ग्रंथाची निवड करण्यात आली.‘आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प’ अशी गरज असताना शासनस्तरावरून मात्र या कायद्याला उशीरच लावण्यात आला. या पार्श्वभूमीवर आजरा चित्री नदी धरण प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष एक आदर्श वस्तुपाठ ठरला. या संघर्षातून आधी पुनर्वसन आणि नंतर धरण प्रकल्प पूर्णत्वास गेला. मात्र ही घटना एवढ्यावरच थांबत नाही तर चित्रीच्या संघर्षातून विविध जात-धर्म, समाजस्तरात एकोपा निर्माण झाला. समाज मंदिरात प्रथमच सहभोजन झाले आणि एखाद्या विशिष्ट जातीचे प्रश्‍न हे एकूण समाजाचेही असतात ही भावना वाढीस लागली. या यशस्वी लोकलढ्याची यशोगाथा चित्री धरणग्रस्त पुनर्वसन चळवळीचे बिनीचे शिलेदार का. देसाई यांनी ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या नावाने शब्दबद्ध केली असल्याने या ग्रंथाची कबीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पुरस्कार निवड समीतीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

\