मोर्लेत घरावर झाड पडून नुकसान : विदयुत पोलहि कोसळले
दोडामार्ग, ता. ०६ : दोडामार्ग तालुक्यामध्ये बुधवारी पहाटे वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने कहर केला. मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे मोर्ले गावातील शिरीषकुमार मणेरीकर यांचे घरा लगतच असणारे आंब्याचे झाड फणसावर पडले. यामुळे फणसाचे झाड उन्मळून त्यांच्या घरावर पडले. हे झाड थेट सिमेंटचे पत्रे फोडून व लोखंडी खांब मोडून घरात घुसले. मणेरीकर ज्या ठिकाणी रोज झोपाळ्यावर बसतात त्याच ठिकाणी हा प्रकार घडला. मणेरीकर यांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने सुदैवाने अनर्थ टळला. मात्र मणेरीकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
त्याच बरोबर गावातील सुहास नाईक, नीता मोहन बांदेकर, गणपत बाळा देसाई यांच्याही घराची कौल वाऱ्याने उडून गेली. त्यांच्या केळी बागायतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी विधुत पोल ही रस्त्यावर आडवे झाले.