Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामान्सूनपूर्व पावसाचा आचरा परिसरास तडाखा...

मान्सूनपूर्व पावसाचा आचरा परिसरास तडाखा…

तळाशीलमध्ये पडली वीज ; मलबारे कुटुंबीय सुदैवाने बचावले...

आचरा, ता. ६ :मेघगर्जनेसह आज पहाटे दाखल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपून काढले. वरचीवाडी, हिर्लेवाडी येथे घरांवर झाडे पडून नुकसान झाले तर तोंडवळी तळाशील येथे सुरूच्या झाडावर वीज पडून ती विद्युत वायरमधून घरात घुसली. यात नारायण मलबारे यांच्या घरातील वीज मीटरसह साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. यात विजेच्या लोळामुळे उडालेल्या ठिणग्यामुळे सखाराम मलबारे यांना किरकोळ दुखापत झाली. तर गौरव मालंडकरला विजेचा धक्का बसला.
आचरा येथे आज पहाटे सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. तोंडवळी तळाशील येथील मलबारे कुटुंबीयांनी विजेचा थैमान घरात अनुभवला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मलबारे कुटुंबीय यातून बचावले. पहाटे सव्वा सहाच्या सुमारास मलबारे यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या मोठ्या सुरूच्या वृक्षावर वीज पडली. ही वीज विद्युत वायरमधून घरात घुसल्याने संपूर्ण वायर जळून खाक झाली. घरातील भिंतीच्या ठिकर्‍या उडाल्या. भिंतीवरील घड्याळाचेही नुकसान झाले. विजेच्या ठिणग्या बाहेर लाकडी बाकावर बसलेल्या सखाराम मलबारे यांच्या अंगावर पडल्याने ते किरकोळ भाजले. घराबाहेर गाडी लावण्यास आलेल्या गौरव मालंडकर याचा भिंतीला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला. परिसरातील घरांनाही विजेचा धक्का जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थ गजानन तारी यांनी सांगितले. शशिकांत पाटील, विनायक जोशी यांच्या घरातील इन्व्हर्टर जळाल्याने नुकसान झाले.
मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याच्या वार्‍यामुळे आचरा वरचीवाडी येथील भजनीबुवा रामदास आचरेकर, विलास आचरेकर यांच्या घरावर जुनाट मोठा वृक्ष पडल्याने दोन्ही घरांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. हिर्लेवाडी येथील सुहासिनी कांबळी यांच्या घरावर माड आणि आंब्याचा वृक्ष मोडून पडल्याने पडवीचे नुकसान झाले. याबाबत आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा कांबळी, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी, समीर बावकर, आदींनी भेट देऊन पाहणी केली. आचरा हिर्लेवाडी मेस्त्रीवाडी भागात रतांबीचे झाड पडून दोन विद्युत पोल मोडल्याने महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. पहाटेपासूनच वीजपुरवठा खंडित झाल्याने आचरा भागातील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल झाले.
आचरा जामडूलवाडी येथे प्रमोद वाडेकर यांच्या स्लॅबवर माड पडून नुकसान झाले. जामडूल येथे खोपीवर माड पडल्याने सदाशिव आचरेकर हे जखमी झाले. पिरावाडी येथे रस्त्यावर सुरूचे झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments