कणकवलीतील चौपदरीकरण बंद आंदोलन स्थगित

221
2

ठेकेदाराकडून गटार खोदाई, नाले सफाईची कामे सुरू

कणकवली, ता.6 : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक हायवेचे काम बंद पाडण्यासाठी आज रस्त्यावर उतरले. मात्र हायवे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी आजपासूनच चौपदरीकरणाचे काम बंद ठेवून शहरातील कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यानंतर चौपदरीकरण बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. तर सायंकाळ पर्यंत शहरातील गटार खुदाई, पाणी निचरा होण्याची व्यवस्था, सर्व्हीस रोडची डागडुजी आदी कामे केली जात होती.
कणकवलीत चौपदरीकरण करताना नाले बुजविण्यात आले. ठिकठिकाणी भराव टाकल्याने पावसाळी पाणी वाहून जाणारे मार्ग बंद करण्यात झाले. गटारांची बांधकामे अर्धवट राहिली. ही कामे पूर्ण होत नसल्याने हायवेचे काम बंद पाडण्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी 11 वाजता स्टेट बँकेसमोर हायवेचे काम बंद पाडण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह इतर नगरसेवक आणि स्वाभिमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले. या सर्वांनी हायवेचे शाखा अभियंता गणेश महाजन आणि दिलीप बिल्डकॉनचे रवीकुमार यांना घेराओ घातला. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, महिला सभापती उर्मी जाधव यांच्यासह नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित हर्णे, अबिद नाईक, मेघा गांगण, अ‍ॅड.विराज भोसले, कविता राणे, माजी नगरसेवक किशोर राणे, कंझ्युमर सोसायटीचे संदीप नलावडे तसेच महाराष्ट्र स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित मुसळे, अबिद नाईक, किशोर राणे आदींनी हायवे अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील समस्यांबाबत दहा वेळा बैठका लावल्या. प्रत्येकवेळी दहा दिवसांत करतो, चार दिवसांत करतो अशी आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात काहीच काम केलात नाहीत. त्यामुळे लोकांच्या घरांत, दुकानांत पाणी गेले आहे. आता हायवेचे शहरातील काम बंद ठेवा आणि शहरातील समस्या मार्गी लावा अन्यथा एकाही पिलरचे काम होऊ देणार नाही असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला. तर सर्व्हिस रोड तयार होण्याआधीच पिलरच काम का सुरू केलात? गटारांची कामे आधी का केली नाहीत अशा प्रश्‍नांची सरबत्ती अभिजित मुसळे, किशोर राणे आदींनी केली. यावेळी रवीकुमार आणि गणेश महाजन यांनी पुढील दोन दिवस शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद ठेवू. तसेच सर्व यंत्रणा शहरातील कामांसाठी वापरण्यात येईल अशी ग्वाही दिली. तर पुढील दोन दिवसांत शहरातील कामे पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाचे काम पुन्हा बंद पाडू असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.

4