Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ला न. प. च्या जलतरण तलावाची दुरावस्था : नगरसेवकांचा आरोप

वेंगुर्ला न. प. च्या जलतरण तलावाची दुरावस्था : नगरसेवकांचा आरोप

नुतनीकरणाचे काम लवकरच : नगराध्यक्ष गिरप

वेंगुर्ले, ता. ६ : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जलतरण तलावाची सध्या दुरावस्था झाली असून या तलावात पोहण्यास येणाऱ्या नागरीक व मुलांना येथील तुटलेल्या फरशा लागून दुखापत होत आहे. असे बरेच प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आले आहेत. असा आरोप नगरसेवक विधाता सावंत व शितल आंगचेकर यांनी करून तात्काळ कार्यवाहीची मागणी आजच्या न. प. सर्वसाधारण सभेत केली. याबाबत पावसाळ्यात जलतरण तलाव बंद ठेऊन नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, साक्षी पेडणेकर,श्रेया मयेकर, राजेश कांबळी, सुमन निकम, नागेश गावडे, प्रशांत आपटे, संदेश निकम, कृतिका कुबल,कृपा गिरप, शितल आंगचेकर, पुनम जाधव, प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, स्नेहल खोबरेकर,मुख्याधिकारी वैभव साबळे व कार्यालयीन अधिक्षक उपस्थित होते.
या सभेत वेंगुर्ले शहरातील अस्तित्वातील पाणी पुरवठा पाईप लाईन बदलणे कामी मागविण्यात आलेल्या ई निविदांमध्ये कमीत कमी ३२टक्के जादा रक्कमेची निविदा भरण्यात आल्याने २ कोटी ११ लाख ८२ हजार १४२ रक्कमेच्या ४ कामांची निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्याचे ठरविण्यात आले. पुन्हा निविदा प्रसिद्ध करुनही जादा रक्कमेच्या निविदा प्राप्त झाल्यास याबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन सदर कामांच्या निविदा मंजूर करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. नगरपरिषद मालकीच्या रस्त्यावर काही नागरीकांनी कायमस्वरुपी बंद गाड्या पार्किग करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अशा वाहनधारकांना प्रथम नोटीस देऊन सूचना करण्यात येणार आहे व सूचना करुनही जर वाहनधारकांनी गाड्या हटविल्या नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. रायफल शुटींग प्रशिक्षणासाठी नगरपरिषदेच्या व्यायाम शाळेवरील हॉल बंदिस्त करण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली. नगरपरिषद हद्दीतील पावसाळी गटारे साफसफाई करण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषदेच्या भाजी मार्केट इमारतीवरील सिमेंटच्या पत्र्यांना बरीच वर्षे झाल्याने त्यांना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गळती होऊन भाजी विक्रेत्यांना त्रास होणार आहे. जे पत्रे खराब झाले आहेत ते तत्काळ बदलण्याच्या खर्चास सभागृहाची मंजूरी देण्यात आली.
नगरपरिषदेच्या कंपोस्ट डेपोमधील प्लॅस्टीक क्रशर मशिन, कांडी कोळसा प्रकल्प व सूका कचरा संकलनासाठी मुंबईच्या आयआयटीशी संबंधित कंपन्यांनी चालविण्यास घेण्याची मागणी केली आहे. यासाठी वार्षिक ३ लाख रुपये नगरपरिषदेस देण्यास सदर कंपनी तयार असून याबाबतच्या अटी शर्तींवर कंपनीच्या व्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा करुन नंतरच सदर प्रकल्प चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषद हद्दतील रस्त्यांचे रस्ता सुरक्षा लेखा परिक्षण करणे, खाजगी जागांवरील आरक्षण व रस्ते संपादीत अथवा अधिग्रहीत करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा व ठराव करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments