Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावराड-सोनवडेपार पुलाचे भूमीपुजन करणारे अधिकारी अडचणीत

वराड-सोनवडेपार पुलाचे भूमीपुजन करणारे अधिकारी अडचणीत

कारवाईची मागणी : पंचायत समिती बैठकीत सदस्य घाडीगावकर, परुळेकर आक्रमक

मालवण, ता. ६ : सीआरझेड विभागाची परवानगी मिळाली नसताना तालुक्यातील वराड-सोनवडेपार पुलाचे भूमीपुजन करणारे अधिकारी अडचणीत आले आहेत. त्या पुलासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी आज येथील पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य सुनील घाडीगावकर व राजू परुळेकर यांनी दिली.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधार्‍यांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, मनीषा वराडकर, छाया परब, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सुरवातीस यशवंत पंचायत राज अभियानात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सुनील घाडीगावकर यांनी मांडला. लोकसभा निवडणूकीत विजयी झालेल्या खासदार विनायक राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव मधुरा चोपडेकर यांनी मांडला तर बारावी परीक्षेत तालुक्याचा चांगला निकाल लागल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव निधी मुणगेकर यांनी मांडला.
वराड सोनवडे पुलाच्या कामास सीआरझेड विभागाची परवानगी मिळाली नसताना त्याचे भूमीपूजन कसे करण्यात आले. भूमीपूजनाचा शासकीय कार्यक्रम कसा झाला असे प्रश्‍न उपस्थित करत श्री. घाडीगावकर, श्री. परुळेकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी असा ठराव मांडला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता पदभार न देताच परस्पर रजेवर निघून गेल्याने गटविकास अधिकारी श्री. पराडकर यांनी नाराजी व्यक्त केली. रस्ता कामाची पाहणीच्या पंचायत समितीची सूचना असूनही त्याचे पालन न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांनी दिले.
मुसळधार पावसात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक झाडे पडली. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटविण्याच्या सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कार्यवाही केली नाही. त्यामुळे धोकादायक झाडांमुळे मनुष्यहानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकामचे अधिकारीच जबाबदार राहतील असा इशारा श्री. घाडीगावकर यांनी दिला. कोळंब पूलाच्या दुरूस्तीचे काम १५ मे पर्यत पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदारा विरोधात दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यावर चाचणी करून अवजड वाहतूक सुरू केली जाईल असे बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बांदिवडे भगवंतगड खार बंधार्‍याचे भूमीपूजनानंतरही कामास सुरवात न झाल्याने विहिरींचे पाणी खारे बनले असून ग्रामस्थांचे हाल झाल्याचे उपसभापती अशोक बागवे यांनी सांगितले. यावर संंबंधित ठेकेदार काम करत नसल्याचे खारभूमीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कांदळगाव हडी येथील बंधार्‍यास झडपे बसविण्याची कार्यवाही करावी अशा सूचना सभापती सोनाली कोदे यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments