संजय पाचपोर : जिल्ह्यातील संस्थांशी साधला संवाद
सिंधुदुर्गनगरी,ता. ०६ : सिंधुदुर्गात फळप्रक्रिया व भात खरेदी नोव्हेंबर मध्ये सुरु करण्याचा प्रयत्न सहकार भारती संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकाराला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपली संघटना प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.
भाजप प्रणित सहकार भारती संघटनेचा गुरुवारी सिंधुदुर्ग संपर्क दौरा झाला. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात जिल्ह्यातील सहकार कार्यकर्ते व संस्था यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील ५० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संचालक अतुल काळसेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, सहकार भारतीचे कोकण अध्यक्ष दादा विचारे, उपाध्यक्ष धनंजय यादव, सिंधुदुर्ग अध्यक्ष अमित आवटे, चंद्रशेखर देसाई आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाचपोर यांनी, देशात दहा लाख व्यक्तिगत तर २० हजार संस्थागत सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात ५० व्यक्तिगत तर १०० संस्था सभासद करण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी संस्था प्रतिनिधींनी भात उत्पादन ऑक्टोबर महिन्यात होते. खरेदी जानेवारी महिन्यात होते, अशी तक्रार केली. हि खरेदी नोव्हेंबर महिन्यात होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आंबा, काजू यावर फळ प्रिक्रिया होणारे सहकार तत्त्वावरील उद्योग सुरु व्हावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची गरज आहे. हे प्रशिक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे, असे यावेळी पाचपोर म्हणाले.
जिल्ह्यात उत्पादित झालेल्या मालाला गोडाऊन मिळावे, अशी मागणी यावेळी झाली. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून हि सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याचे यावेळी पाचपोर यांनी सांगितले. गटसचिवांचे मानधन प्रतिवर्षी काही टक्के प्रमाणात वाढावे, अशी यावेळी मागणी झाली. तसेच शासनाने जाहीर केलेली खावटी कर्जमाफी लवकर मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. शासनाच्या विविध योजनांसाठी पुरविण्यात येणारे साहित्य सहकार संस्थांनी उत्पादित करण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्र सरकारच्या निल क्रांती अंतर्गत २० हजार कोटींचा निधी राखीव आहे. हा निधी सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत-जास्त आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही यावेळी पाचपोर यांनी सांगितले.