रोपां ऐवजी बांबूची कंद मुळांची लागवड लाभदायक : बांबू शेती तज्ज्ञ दीपक खडपे

358
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

वैभववाडी,ता. ०७ : बांबूच्या रोपांची लागवड केली तर त्याला बरीच मेहनत आहे.काही वर्षे उन्हाळ्यात पाणी घालणे गरजेचे आहे. १० वर्षे मेहनत घेतल्यानंतर बांबूची बेट तयार होईल. पण जर का तुम्ही कंदमुळ असलेल्या बांबूची लागवड केली तर मात्र मेहनत कमी करूनही अवघ्या पाच वर्षात बेट तयार होईल व शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक लाभ मिळेल. या साठी रोपांऐवजी कंदमुळ असलेल्या बांबूची लागवड करणे आवश्यक आहे. असे मत राजापूर येथे ३९ एकर मध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले दीपक खडपे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याने एक हजार हेक्टर मध्ये बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून माणगा जातीच्या एक लाख रोपांची लागवड होणार आहे.या बाबत आपले मत व्यक्त करताना खडपे बोलत होते.खडपे यांनी बाबू लागवडीवर विविध प्रयोग केले आहेत. आणि त्यांचा अनुभव दांडगा आहे.त्यांनी बांबूच्या तीन हजार बेटी तयार केल्या असून यापुढे पंधरा हजार बेटी लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सांगितले,शासन रोपे आणि अनुदान देते म्हणून शेतकरी बांबूच्या रोपांची लागवड करेल पण त्यासाठी कुंपणाची गरज आहे. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था हवी.तसेच लागणारी मशागत करणे महत्वाचे आहे.अशा रोपांचे मरणाचे प्रमाण अधिक आहे.प्रचंड मेहनत घेऊनही बेट तयार व्हायला १० वर्षे लागतील. त्यानंतर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. पण जर का कंद मुळ असलेल्या बांबूची लागवड केली तर त्याला मेहनत कमी करावी लागेल आणि फायदा अधिक मिळेल. त्यासाठी शेतकऱ्याने कंदमूळ असलेल्या बांबूची लागवड केली पाहिजे अशी शिफारस त्यांनी केली.
अनेकांना मोठ्याप्रमाणात कंदमूळ असलेल्या बांबू ची लागवड करायची असते. पण तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.काही व्यावसायिक लोक अशी कंदमुळे विकत असतील त्यांच्याकडून बांबू विकत घेतले पाहिजेत. ते घेऊन लावावेत. बांबूची लागवड करताना मोठी जोखीम आहे. घाईघाईत लागवड करण्याचे हे काम नाही नाहीतर खर्च केलेले पैसे आणि मेहनत वाया जाईल. तेवढ्या प्रमाणात कंद मुळे उपलब्ध होत नसतील तर टप्याटप्याने लागवड करा. लागवडी साठी सर्वात बेस्ट चिवा आहे. त्याचे उत्पन्न जास्त आहे. मागणी मोठी आणि आयुष्य शेकडो वर्षे आहे. कंदमूळ लागवडीला शासन अनुदान देत असून यापुढे कृषी अधिकाऱ्यांनी चिवार जातीची रोपे तयार करायला हवीत. अशी मागणी त्यांनी केली.
खडपे यांनी चिवार आणि माणगा जातीचे बांबू लावले आहेत.१५ हजार बाबू बेटी तयार करण्याचे नियोजन आहे. ते बांबूची कंदमुळे विकत नाहीत. कारण त्यांना स्वतः त्याची लागवड करायची असते.यावर्षी ते हजार बांबूची लागवड करणार आहेत.आपल्याच बेटीतून बांबू काढून ते दरवर्षी लागवड करतात. एक वर्षाच्या नव्या बांबूची लागवड केली जाते असे सांगितले जात असले तरी दोन तीन वर्षाचा जुना बांबू लावल्यावर त्यापासून बेट तयार झाल्याची त्यांचा दावा आहे. दोन तीन वर्षाच्या चार पाच बांबूची लागवड करून माझ्यासारखा प्रयोग शेतकऱ्याने करून पहावा नि तो यशस्वी झाला तर त्याने अशा बांबूची अधिक लागवड करावी अशी सूचना त्यांनी केली.पावसाळ्यापूर्वी बांबूच्या मुळात पालापाचोळा जवळ करून ठेवावा आणि पहिल्याच पावसात थोड खत दिले तर बांबू खूपच प्रतिसाद देत त्याचे उत्पादन वाढते असे खडपे यांनी बोलताना सांगितले.

\