वैभववाडी, ता. ०७ : लोरे नं. २ मांजलकरवाडी येथील वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धोंडू गुणाजी पानकर (वय ८०, रा.लोरे नं. २ मांजलकरवाडी) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद वैभववाडी पोलिसात आकस्मिक म्हणून करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत धोंडू पानकर यांच्या घरी बुधवारी रात्री जेवणाचा कार्यक्रम होता. चुलते, जावई या कार्यक्रमात एकत्र होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवण केले व ते घरी येऊन झोपले; मात्र आज सकाळी ते आढळून आले नाहीत. त्यांचा त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचे जावई चंद्रकांत वळंजु यांना त्यांचा मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला. त्यांचा पुतण्या दिगंबर दिनकर पानकर यांनी घटनेची खबर वैभववाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
अधिक तपास पो. हवालदार संजय खाडे करत आहेत.