कुडाळ ओंकार डिलक्स सभागृहात २२ जून पासून आयोजन
जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान व गणेश मूर्तिकार संघटनेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ : पर्यावरण पूरक व वजनाने हलके असलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे महत्व जिल्ह्यातील गणेश भक्तांना कळावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात भव्य प्रदर्शन व स्पर्धा २२ व २३ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित या पत्रकार परिषदेला भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावंत, इकोफ्रेंडली मूर्तिकार विलास माळगावकर आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाचे उदघाटन २२ रोजी दु. ३ वा. होऊन २३ रोजी दु. ४ समारोप आहे. १९ जून पर्यंत बापू सावंत ९४२२०७८५३९, विलास माळगावकर ९४२२३७९६१९ व मंदार चव्हाण ९४२२५९६१५१ येथे नावनोंदणी करावयाची आहे. यासाठी प्रथम- ११ हजार रुपये, द्वितीय- ७ हजार रुपये, तृतीय- ५ हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ २१०० रुपये तसेच मूर्तीची सुबकता, कौशल्य, रेखीव, रंगसंगती यांच्यासाठी प्रत्येकी ११०० रुपये तर सर्वोत्तम आराससाठी २५०० रुपये तसेच सर्वाना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सध्या ३५ इकोफ्रेंडली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. जिल्ह्यात सध्या १० मूर्तिकार इकोफ्रेंडली मूर्ती बनवितात. १५० जणांना इकोफ्रेंडली मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हि मूर्ती पर्यावरण पूरक आहे. ती पाण्यात पटकन विरघळते. तसेच सवा फूट मूर्तीचे वजन केवळ १८०० ग्रॅम असते. सर्वच दृष्टीने इकोफ्रेंडली मूर्ती फायदेशीर आहे. याबाबत जनजागृती व्हावी. लोकांना त्याचे महत्व कळावे, या उद्देशाने हे प्रदर्शन व स्पर्धा भरविण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश उत्सवासाठी याठिकाणी आवडलेली मूर्ती नोंदणी करण्याची मुभा ठेवण्यात आली आहे, असे यावेळी सतीश सावंत यांनी सांगितले. इकोफ्रेंडली मूर्तिकारांना आर्थिक उपलब्धता व्हावी, यासाठी लवकरच जिल्हा बँक धोरण ठरविणार आहे असेही यावेळी सावंत यांनी सांगितले.