वित्त समितीला खातेप्रमुखांच्या प्रतिनिधींना ‘बॅन’

128
2
Google search engine
Google search engine

सदस्यच चालविणार सभा : खातेप्रमुखांच्या अनुपस्थीतीमुळे घेतला निर्णय

सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ : वारंवार सूचना देऊनही खातेप्रमुख सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधीला सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’ अशी स्थिती सभागृहात झाली आहे. यापुढील सभेत खातेप्रमुख आले तर ठीक. अन्यथा त्यांच्या प्रतिनिधीला सभागृहात घेऊ नका. वित्त विभागा व सदस्य सभा चालवतील, असे शुक्रवारी झालेल्या वित्त समिती सभेत रवींद्र जठार यांनी सांगितले. तसे आदेश सभापती जेरॉन फर्नांडिस यांनी दित तसा ठराव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यास सांगितले.
जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेला मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, सदस्य संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, अनघा राणे, नितीन शिरोडकर उपस्थित होते.
हि सभा अधिकारी अनुपस्थितीवर जास्त गाजली. यानंतर कृषी विभागाच्यावतीने पुरविण्यात आलेल्या साहित्याचे अनुदान अद्याप का मिळाले नाही ? यावर सुद्धा जोरदार चर्चा झाली. यावेळी वित्त विभाग कृषी विभागाकडे तर कृषी विभाग वित्त विभागाकडे बोट दाखवीत होते. वित्त अधिकारी जगदाळे यांनी कृषी विभागाने अपूर्ण माहिती पुरविली होती. त्याची पूर्तता करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष बैठक घेऊन जिल्हा कृषी अधिकारी यांना वारंवार दिली होती, असे सांगितले. यावर जठार यांनी लाभार्थीनी उसने पैसे घेऊन साहित्य खरेदी केले आहे. त्यांचे नुकसान का करता ? असा प्रश्न केला. अखेर सर्व लाभार्थीच्या अनुदानाचा धनादेश कृषी विभागाकडे देण्यात आला असून काही दिवसात हि रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा होईल, असे सांगितल्याने हा विषय थांबला.
जावळे यांच्या चौकशीसाठी समिती गठीत
उमेद अभियानाचे कणकवली समन्वयक जावळे यांच्या चौकशीसाठी वैभववाडी सहाय्यक गटविकास अधिकारी यांची चौकशी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच उमेदच्या संचालकांना सादर करण्यात येईल. यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्चित होईल, असे सांगण्यात आले.