वेंगुर्ले, ता. ७ : तुळस येथील जैतिर उत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक विधींनी सुरू आहे. या उत्सवाची ३ जून रोजी भक्तिमत वातावरणात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दरदिवशी मंदिरात विविध धार्मिक विधी सुरू असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. काल रात्रौ जैतिर उत्सवाच्या निमित्ताने जैतिर मंदिरात साजरा केलेला दीपोत्सव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
मंदिरात उत्साहात व भक्तिभावाने प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांच्या प्रकाशाने जैतिर मंदिर तेजोमय झाले होते. प्रतिवर्षी प्रमाणे उत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रथे प्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यादिवशी सायंकाळी श्री देव जैतिर व तरंग देवता अवसरी रूपात मंदिराच्या समोर मांडावर धार्मिक विधी करण्यात येतात. यानंतर देव जैतिर व तरंग देवता गाववासियांना दर्शन देण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी जातात. त्यानंतर रात्रौ ग्रामस्थ मोठ्या आस्थेने व श्रद्धेने दिव्यांची आरास संपूर्ण मंदिरात सजवतात व दीपोत्सव साजरा करतात व संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जाते. अश्या प्रकारे अकरा दिवस विविध विधींनी उत्सव सुरू असून बुधवार १२ जून रोजी कवळासने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उत्सवास उपस्थित राहून देव दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष व मानकरी अनिल परब, खजिनदार सुधीर झाट्ये, सचिव आपा परब यांनी केले आहे.