चाफेड गावाला टँकर मंजुरच नाही

134
2

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे घूमजाव

सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ : देवगड तालुक्यातील चाफेड या एकमेव गावाला प्रांताधिकारी यांच्या समितीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर केल्याचे जलव्यवस्थापन समिती सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सांगितले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या बांधकाम सभेत प्रदीप नारकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सावंत यांनी चाफेड गावाला टँकर मंजुरच झाला नसल्याचे सांगत घूमजाव केले.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा शुक्रवारी नाथ पै सभागृहात सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य रेश्मा सावंत, रवींद्र जठार, राजेश कविटकर, प्रदीप नारकर, मनस्वी घारे आदी उपस्थित होते.
फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व अन्य कर्मचारी शासकीय निवासी राहत नाहीत. एकादा रुग्ण रात्रीचा आल्यावर त्यांना फोन करून बोलवावे लागते. डॉक्टरला रात्रीचे उठविण्यास कर्मचारी घाबरू लागल्याने एका रुग्णाला कणकवली उपजिल्हा रुग्नालयात न्यावे लागले. आता पावसाळा सुरु होणार आहे. या कालावधीत सर्प दंश सारखे रुग्ण येणार आहेत. त्यामुळे डॉक्टर हेड क्वाटर्सला राहणार कि नाही, असा प्रश्न नारकर यांनी उपस्थित केला.
…तर जिल्हा परिषदेत शाळा भरविणार :- जठार
मुंबई-गोवा चौपदारीकरणात बाधित झालेल्या खारेपाटण रामेश्वर शाळेला पर्यायी इमारत उभारण्यात येत आहे. मात्र, ठेकेदार धीम्या गतीने काम करीत असल्याने अद्याप स्लॅब पडलेले नाही. १७ जूनला शाळा सुरु होणार आहे. गेल्यावर्षी ज्या नर यांच्या खाजगी घरात शाळा भरविण्यात आली होती. ते सुद्धा घर हायवे बाधित असल्याने ते लवकरच पाडण्यात येणार आहे. तर पहिली ते सातवी पर्यंतची मुळे बसतील अशी दुसरी जागा नाही, असे सांगत आता या शाळेतील मुळे कुठे बसविणार ? मुलांची व्यवस्था झाली नाहीतर शाळा जिल्हा परिषदेत भरविणार, असा इशारा रवींद्र जठार यांनी दिला. यावेळी अनामिका जाधव यांनी शाळा सुरु होईपर्यंत वर्गखोली तयार करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. यावेळी जठार यांनी ठेकेदार कोणाला जुमानत नाही. प्रत्येक कामात तो असाच बेफिकीर राहतो. तरीही अधिकारी त्याला पाठीशी का घालतात ? काळ्या यादीत का टाकत नाही ? असा प्रश्न केला.

4