अरविंद शिरसाट : आम्ही कोणाकडे टेंडर मागीतलेच नाही
सावंतवाडी, ता. ०७ : आम्ही शाळेची कोणती बदनामी केली नाही तर उलट सभागृह आणि शौचालय या सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आमच्यावर बदनामीचे आरोप करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी मतदारांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास कसा काय केला हे प्रथम पाहावे आणि नंतरच मतदान करावे, असा पलटवार भवानी पॅनलचे प्रमुख अरविंद शिरसाट यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान आमच्या पॅनलमधील कोणताही सदस्य यांच्याकडे टेंडर मागण्यासाठी गेला नव्हता. नाहक आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत. आरोप करण्यापेक्षा अधिकृत कागद दाखवावे असे यावेळी शिरसाट यांनी सांगितले.
उत्कर्ष पॅनेलच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेऊन भवानी पॅनलवर आरोप करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पॅनलच्या वतीने येथील पर्णकुटी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गौतम गव्हाणकर, ओंकार तुळसुलकर आदी उपस्थित होते. यावेळी शिरसाट म्हणाले, बदनामी करण्यासारखे अनेक गोष्टी होत्य. परंतु शाळेचे हित लक्षात घेऊन आम्ही त्याची कधी बाहेर वाच्यता केली नाही. परंतु शाळेची प्रगती व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले. शाळेची रोडावलेली पटसंख्या ही 2011 पासूनची आहे. त्यात आमचा कोणताही संबंध नाही. परंतु विद्यमान पॅनलनेही गेल्या काही वर्षात विद्यार्थी संख्या कशी घटली याचे उत्तर द्यावे.
शिरसाठ पुढे म्हणाले, याठिकाणी विद्यमान पॅनल 2012- 13 मध्ये पुरस्कार वाटप केल्याची माहीती मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला माहिती अधिकाराचा वापर केला हे दुदैव आहे. असे अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत मात्र आता बोलावेसे वाटत नाही, ही वेळ नाही असे सांगून त्यांनी शाळेची प्रगती करण्यास आजही आम्ही तत्पर आहोत आणि आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असा दावा केला.