वडाचापाट सरपंच, सदस्यांच्या निलंबनास स्थगिती…

2

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतली सुनावणी : अंतिम निर्णयाकडे लक्ष…

मालवण, ता. ७ : वडाचापाट ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य चार सदस्यांना निलंबित करण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशास ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरपंचासह अन्य चार ग्रामपंचायत सदस्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या स्थगितीच्या आदेशाची प्रत अवर सचिव नीला रानडे यांनी कोकण विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविली आहे. वडाचापाट ग्रामपंचायतीमधील एका कर्मचार्‍यास कमी केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ८ एप्रिलला सरपंच नमिता कासले यांच्यासह उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, अनंत पाटकर, विद्याधर पाटकर, सुगंधी बांदकर यांना निलंबित केले होते. या आदेशाविरोधात सरपंच व अन्य सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचे कलम ३९ (३) अन्वये ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार ४ जूनला ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली. येत्या काळात पावसाळी अधिवेशन तसेच इतर शासकीय कामे असल्याने निर्णय देण्यास काही कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करत कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती आदेश दिले. या आदेशाची प्रत संबंधितांना पाठविली आहे.

5

4