पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.21 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस कॉन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संपादित केलेल्या गुणांच्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे.
कोकण अव्वल, नागपूर तळाला
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 88.38 टक्के निकाल लागला आहे. तर 67.27 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.
यंदाही मुलींची बाजी
निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 10.64 टक्क्यांनी जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.
संपूर्ण राज्यात यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीचा विभागनिहाय निकाल
पुणे – 82.48 टक्के
मुंबई – 77.04 टक्के
नागपूर – 67.27 टक्के
अमरावती – 71.98 टक्के
लातूर – 72.87 टक्के
नाशिक – 77.58 टक्के
औरंगाबाद – 75.20 टक्के
कोल्हापूर – 86.58 टक्के
कोकण – 88.38 टक्के
याठिकाणी पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असं लिहावं लागेल.
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात