कणकवलीतील वीज प्रश्नासंदर्भात मराठा संघाचे पदाधिकारी आक्रमक…

2

 

कार्यकारी अभियंत्यांना निवेदन; अन्यथा आंदोलन छेडू ,दिला इशारा…

कणकवली,ता.०९: तालुक्यात निर्माण होणाऱ्या वीज समस्या बाबत आज मराठा समाजाचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला. तात्काळ याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी केली. अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने आज कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी आपण योग्य ती भूमिका घेऊ असे आश्वासन श्री मोहिते यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत, कोकण उपाध्यक्ष एस.एल.सपकाळ, उपाध्यक्ष लवु वारंग,सुशील सावंत, भाई परब, बच्चू प्रभुगावकर ,निळकंठ वारंग,यश सावंत,आप्पा सावंत आर.जी. सावंत आदी पदाधिकारी व मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
वायरमन अरेरावी करतात, त्यावर कारवाई केली पाहिजे. वीज बिलातील व्याज आकारणी थांबवा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्याज आकरणी हा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र,मीटर रिडिंग न जाताच घेतलं जातं, हे लक्षात येत असल्याची कबुली कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली. स्थिर आकार वाढवला गेला आहे. त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा केली, त्यावर एमएआरसीच्या परवानगी शिवाय काहीही करता येत नाही, असे श्री.मोहिते यांनी सांगत आपल्या मागण्यांवर त्वरीत मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,
वीज ग्राहकांना अवास्तव वीज बिले व स्थिर आकार आकारली जात आहेत. कोरोना महामारीत सर्वसामान्य नागरिक आर्थिक समस्यांनी त्रासलेला आहे. तरीदेखील आपल्या कंपनीकडे ग्राहकांचे अनामत असताना देखील मीटर भाडे आकारले जात आहे, ही बाब चुकीची आहे. तसेच थकीत वीज ग्राहकांना वीज बिल माफी देणार अशी घोषणा उर्जा मंत्री नितीन ऱाऊत यांनी केली होती. मात्र ती अद्यापही वीज बिल माफी मिळालेली नाही. त्याकाळात वीज बिलांत माफी मिळणार म्हणून ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. त्या वीज बिल वसुलीचा तगादा आपले अधिकारी व कर्मचारी लावत आहेत. वीज बिलांवर व्याज आकारले जाते, ते आकारु नये त्यामुळे मानसिक त्रास वीज ग्राहकांना होत आहे तो थांबवण्यात यावा.
तसेच थेट विद्युत पुरवठा खंडीत तुमच्या अधिका-यांकडून केला जात आहे. तसे न करता ग्राहकांना सवलत देऊन सहानुभुतीने वसुली करावी. गावागावांत कोणतीही परवानगी न घेता वीज पोल व विद्युत ट्रान्सफार्मर याचे महावितरण कंपनीकडून कोणतेही भाडे किंवा मोबदला दिले जात नाही. त्यामुळे आपल्या कंपनीकडून वीज ग्राहकांना होणारा त्रास थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम्ही देत आहोत. तरी या निवेदनाचा विचार करुन तातडीने मार्ग काढावा,असे म्हटले आहे.

99

4