सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्नालयात नवीन सिटी स्कॅन मशीनचा लोकार्पण सोहळा सोमवारी १० जून रोजी माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत, पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेले २ वर्षे बंद असल्याने रुग्नांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या विशेष प्रयत्नांतून सी.एस.आर. फंडातून जिल्हारुग्णालयासाठी अद्ययावत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन सिटी स्कॅन मशीनचा उदघाटन सोहळा सोमवार १० जून रोजी सकाळी ९.३० वा.माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत.
गेले २ वर्षे ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद होते. सिटी स्कॅन अभावी जिल्ह्यातील रुग्ण व नातेवाईकांची फरपट होत होती. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचेही प्रमाण वाढल्याने गंभीर रुग्णांची सिटी स्कॅन चाचणी खाजगी रुग्णालयात करावी लागत होती. जिल्हारुग्णलयात सिटी स्कॅन मशीन अभावी रुग्ण नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे जिल्ह्यात सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार श्री दीपक सावंत यांच्या विशेष प्रयत्नांतून सी एस आर फंडातून सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवारी या मशीनचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात सिटी स्कॅन सुविधा जिल्हारुग्णालयात उपलब्ध होणार आहे. अपघातातील रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.तसेच तपासणीसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात नेण्यासाठीची रुग्ण व नातेवाईकांची होणारी फरपट देखील थांबणार आहे.