वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची जबाबदारी आयपीआरसीएलकडे हस्तांतर ; राज्य शासनाने हात झटकले

469
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबई/प्रतिनिधी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरलेला प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाची असताना त्यातून राज्यसरकराने जबाबदारी टाळत हात झटकले आहेत. मुख्यमत्र्यांनी एका लेखी आदेशानुसार केंद्रशासनाच्या आयपीआरसीएल या कंपनीकडे हा प्रकल्प हस्तांतर केला आहे. त्यामुळे आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या चिपळूण-कराड प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाप्रमाणे वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गाचे भवितव्य अधांतरी असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक, पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण असणारा प्रस्तावित वैभववाडी -कोल्हापूर रेल्वे मार्गाचे २०१५ साली सर्वेक्षण होऊन २०१६ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली.अवघ्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल म्हणून सांगितले गेले. या साठी निधीची तरतूद झाल्याचे सांगून हा प्रकल्प भारतीय रेल्वेने ५० टक्के आणि महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा (एमआरआईडी) कंपनीने ५० टक्के निधी देऊन पूर्ण होण्याच्या अटीवरच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. पण राज्यसरकराने जबाबदारी टाळीत याचे केंद्र शासनाच्या कंपनीला हस्तांतर करीत हात झटकले आहेत.
केंद्र शासनाची इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल ) याकडे या प्रकल्पाची जबाबदारी देम्यात आली आहे. महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा कंपनी (एमआरआईडी)च्या जनसंपर्क खात्याच्या अधिकारी ऋचा कामत यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार या प्रकल्पाची जबाबदारी आमच्याकडे राहिलेली नाही. ती जबाबदरी केंद्र शासनाच्या इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल ) याकडे देण्यात आली आहे. राज्यातील इतर प्रकल्पांची जबादारी आमच्याकडे आहे. असेही कामत यांनी सांगितले.
ज्या केंद्र शासनाच्या कंपनीला कोल्हापूर-वैभववाडी. रेल्वे मार्गाची निम्मी जबाबदरी सोपविण्यात आली आहे. त्या कंपनीने आता पर्यंत १५० कोटी रुपयांचे सहा छोट्या प्रकल्पांचे काम पूर्ण केले आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग हा अंदाजे ४ हजार कोटी रुपये किमतीचा आहे. या कंपनीची पार्श्वभूमी पाहिल्यावर एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प पूर्ण करू शकते का ? आता नव्याने देशभरातील ३२ प्रकल्पांची जबाबदारी या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्याचे डीपीआर बनविण्याचे काम सुरु आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची जबाबदारी जर का राज्यशासनाकडे असती तर औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे लक्ष देऊन हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकला असता असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र जोडणारा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग असलेल्या कोल्हापूर – वैभववाडी या १०७ किलोमीटरच्या मार्गाला २०१६ साली मंजुरी मिळाली. या मार्गाचे कोल्हापूर येथे भूमिपूजन झाले होते. प्रकल्प मंजूर होऊन तीन वर्षे झाली. तरी भूसंपादनाच अद्याप काहीच नाही. चिपळूण-कराड रेल्वे मार्ग ८ वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. हा मार्ग कोकण रेल्वे आणि पीपीपी खाजगी कंपनीच्या भागीदारीत करायचा होता. पण खाजगी कंपनी रस दाखवीत नसल्याने हा प्रकल्प कागदावरच दिसत आहे. एकंदरीत वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाला गेल्या तीन वर्षात गती मिळाली नाही. त्यामुळे त्याचेही भवितव्य अंधारात आहे.

\