कणकवली हुमरठ येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या ओरोस भरारी पथकाने कणकवली हुंबरठतिठा येथे ९ जून रोजी पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीवर कारवाई केली. या कारवाईत ४० लाख ८ हजार रुपयांच्या अवैध दारू सह एकूण ५० लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्या प्रकरणी रितेश बाबू पी. उन्नीकृष्णन पी.(३४) व रजिश व्ही. के. राजन व्ही. के (३२) दोन्ही रा. केरळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून कणकवली ते रत्नागिरी या मार्गावरुन अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे, आर. डी. ठाकुुुुर, दिपक वायदंडे, आर एस शिंदे यांच्या टीमने कणकवली हुंबरठ तिठा येथे सापळा रचला होता. त्यानुसार रविवार ९ जून रोजी पहाटे २:३० च्या सुमारास या पथकाने हुंबरठ तिठा येथे चॉकलेटी रंगाच्या आयशर कंपनीचा ट्रक (एम. एच. ०४ सीपी. ८३०६) या पथकाने थांबण्याचा ईशारा करत हा ट्रक तपासला त्यात ३८ लाख ४० हजार रूपये किमतीचे रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हिस्कीचे १०० बॉक्स, १ लाख ३८ हजार रूपये किंमतीच्या एम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीचे २० बॉक्स अशी एकूण ४० लाख ८ हजार रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. या दारूसह अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला १० लाखाचा आयशर ट्रक असा एकूण ५० लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्या प्रकरणी रितेश बाबू पी. उन्नीकृष्णन पी. (३४) रा. पंथलथ हाउस, काडमपुझा, तिरुर, जि. मल्लपुरम, केरळ आणि रजिश व्ही. के. राजन व्ही. के. (३२) रा.वल्लीए काठिल हाउस, ललीपरब, जि. कुन्नर, केरळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.