Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन जनसेवेसाठी दाखल

जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन जनसेवेसाठी दाखल

माजी आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्याहस्ते लोकार्पण : अनेक वर्षानंतर मिळणार सेवा

? सिंधुदुर्गनगरी ता.१०: दोन कोटी ७१ लाख रुपये किंमतीची सिटीस्कॅन मशीन दोन रेडिओलॉजिस्ट व अन्य टेक्निकल कर्मचारी यांच्यासह जनतेच्या सेवेसाठी जिल्हा रुग्णालयातदाखल झाली आहे. त्यामुळे सिटीस्कॅनमुळे गेली अनेक वर्षे रुग्नांची होणारी परवड थांबली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्याहस्ते हा लोकार्पण सोहळा सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात पार पडला.
यावेळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती झाली त्या डॉ सुप्रिया देशमुख, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, राजेंद्र म्हापसेकर, नागेंद्र परब, संजय पडते, प्रभाकर सावंत व अन्य उपस्थित होते. यावेळो डॉ सावंत यांच्याहस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण झाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी मंत्री भाई सावंत व माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांचे मोठे योगदान आहे. विद्यमान शासनाने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, मनुष्यबळ मिळत नाही. यासाठी जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजची गरज आहे. यासाठी खा. विनायक राऊत व माधव भंडारी यांनी आपले राजकीय वजन वापरावे, अशी विनंती केली. यासाठी वेंगुर्ले येथे २२ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.
माजी आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी, जिल्ह्यात आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय डॉक्टर येणार नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावा, अशी विनंती केली. जिल्ह्याचा पुत्र म्हणून मी येथे सुविधा देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. यावेळी खा. राऊत व आ. नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले.

सिटीस्कॅनमुळे होणारे फायदे
सिटीस्कॅन मशीन अभावी रुग्नांची होणारी परवड थांबणार. येथे दोन रेडिओलॉजिस्ट, तीन क्ष किरण तंत्रज्ञ, एक अधिपरीचारिका, दोन क्ष किरण परिचर अशी नियुक्ती देण्यात आली आहे. पिवळे रेशनकार्ड धारक, अपघात रुग्ण, न्याय वैद्यकीय रुग्ण, स्वातंत्र्य सैनिक, अधिकृत पत्रकार, शासकीय कर्मचारी, बेवारस व्यक्ती, आश्रम शाळेतील व्यक्ती यांना मोफत सेवा मिळणार आहे. ब्रेन ३०० रुपये, अन्य कुठलाही एक भाग ४०० रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments