सहा वर्षानंतर विवाहितेची पतीला सोडून प्रियकराकडे धाव

522
2

पती औरंगाबादचा तर प्रियकर आचर्‍याचा

कणकवली, ता.10 : लग्न होऊन सहा वर्षे झाली. एका मुलाला देखील जन्म दिला. मात्र त्या विवाहितेचे प्रियकराशी असलेले प्रेमसंबंध तसूभर देखील कमी झाले नाही. एवढेच नव्हे तर पोलिसांसमोर पती किंवा प्रियकर यापैकी कुणाची निवड करायचा असा प्रश्‍न उभा राहिला तेव्हा तिने प्रियकराची निवड करत, पती आणि मुलाचाही त्याग केला. या घटनेने खळबळ माजली असून पोलिसांसह दोन्हीकडे नातेवाईक देखील अवाक् झाले.
मूळ गाव जळगाव पण लहानपणापासून मुंबईत वास्तव्य असलेल्या एका युवतीचे सहा वर्षापूर्वी त्याच परिसरात राहणार्‍या एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले. हा तरूण मूळ आचरे गावचा. पण नोकरीसाठी तो मुंबईत आला होता. त्या युवतीचे एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळल्याचे युवतीच्या घरच्या मंडळीच्या लक्षात आल्यानंतर तिचा विवाह औरंगाबाद येथील एका व्यावसायिकाशी करून देण्यात आला. मात्र विवाहानंतरही तिचे त्या तरुणाशी असलेले प्रेमसंबंध अतूट राहिले. ज्या ज्या वेळी ती मुंबईत येत होती तेव्हा तेव्हा ती आपल्या प्रियकराशी गाठीभेटी घेत होती.
दोन दिवसापूर्वी अचानक त्या विवाहितेने नवरा आणि छोट्या मुलाला सोडून मुंबईत प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तिचा प्रियकर मुंबई सोडून गावी आला होता. त्यामुळे त्या विवाहितेने थेट कणकवली गाठली. तिला आचरे गाव आणि त्या प्रियकराचा पत्ता माहिती नव्हता. तसेच अलीकडे तो प्रियकर देखील तिच्याशी संपर्क साधत नव्हता. त्यामुळे त्या विवाहितेने थेट कणकवली पोलिस ठाणे गाठले आणि प्रियकराची गाठभेट घडवून आणण्याची विनंती केली. या घटनेने पोलिस देखील अवाक झाले. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. समुपदेशन देखील करण्यात आले. मात्र तिचा प्रियकराकडे जाण्याचा हट्ट कायम राहिला. त्यामुळे कणकवली पोलिसांनी तिच्या औरंगाबाद येथील पतीला कणकवली पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तसेच आचर्‍याच्या प्रियकरालाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर पती किंवा प्रियकर यापैकी कुणाची निवड करणार याचा निर्णय विचारपूर्वक घ्या असे तिला सांगण्यात आले. यावेळी तिने पती आणि मुलाला सोडून प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर ती सायंकाळी प्रियकरासोबत निघून देखील गेली…

4