झाड कोसळून अल्टोचे नुकसान : सुदैवाने म्हाडेश्वर कुटुंबीय बचावले
कणकवली, ता.११: कणकवली शहर आणि परिसराला दुपारी तीनच्या सुमारास वादळी वार्याचा तडाखा बसला. यात शहरातील टेंबवाडी भागात जुनाट आंब्याच्या फांद्या अल्टोवर कोसळून मोठे नुकसान झाले. या अल्टोतील म्हाडेश्वर कुटुंबीय दहा मिनिटापूर्वीच तेथील दिलीप साटम यांच्या घरी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अल्टो बरोबरच दोन दुचाकी, एक सिमेंट मिक्सरचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. याखेरीज अनेक भागातील नागरिकांच्या घरांचे पत्रे आणि कौले देखील उडाली आहेत. दुपारी तीन ते साडेतीन यावेळेत कणकवली शहर आणि परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. गोवा-पर्रा येथील एकनाथ म्हाडेश्वर हे आपल्या पत्नी आणि मुली समवेत एस.टी.कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप साटम यांच्या टेंबवाडी येथील घरी आले होते. ते घरात पोचल्यानंतर अवघ्या दहा मिनिटा आंब्याच्या फांद्या त्यांच्या अल्टो गाडीवर कोसळल्या.