वेंगुर्ले : ता.११ :पाणी व जमिन वाचविण्यासाठी आता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे काळाची गरज बनली आहे. कोकणामध्ये निसर्ग सौंदर्य आहे पण ते सौंदर्य कायम टिकण्यासाठी पाणी व जमिन वाचवा. जागतिक पर्यावरण दिन हे केवळ कार्यक्रम म्हणून साजरे न होता प्रत्येकाने पर्यावरण वृद्धीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सेंट्रल आॅफ इंटर प्रिनीयॉनशीप डेव्हलमेंट असोसिएशनचे प्रा.डॉ. पार्थ प्रितम शाहु यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या डॉ. शाहु यांनी वेंगुर्ले येथे महिला काथ्या कारखान्याला भेट दिली. याचदिवशी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन कारखान्या मार्फत परिसरात वृक्ष लागवड सुरु होती. त्यामध्ये स्वत: भाग घेवून डॉ. शाहु यांनी वृक्षारोपण केले. यावेळी त्यांच्यासोबत अधिकारी श्रीमती. हेमांगी शर्मा, महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे, संस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब,डीआयसीचे अधिकारी श्री.सर्पे, कोल्हापुर डीआयसीचे जनरल मॅनेजर अनुप कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होेते. कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. यावर्षीही वेंगुर्लेसह सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यातही २००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असल्याचे यावेळी श्री गावडे यांनी सांगितले. दरम्यान महिलांना रोजगार देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपणा सारखे समाजउपयोगी कार्यक्रम कारखान्यामार्फत राबविले जात असल्याबाबत डॉ. शाहु यांनी गौरोद्गार काढले.