अनिर्बंध वाळू उपशामुळे परुळेकर बेट धोक्यात… संबंधितांवर शासनाने कारवाई करावी : परुळेकर कुटुंबियांची मागणी…

2

आचरा, ता. ११ : कालावल खाडीपात्रातील बांदिवडे भागात शासनाने निर्धारित केलेल्या वाळू पॉईंट सोडून वाळू उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराकडून परूळेकर बेटानजिक वाळू उत्खनन केले जात असल्याने परूळेकर बेटाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शासनाने तातडीने दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चिंदर भगवंतगड येथील परूळेकर कुटूंबियांकडून होत आहे.
कालावल खाडीपात्रातील परूळेकर जुवा हे नारळाची झाडे असलेले बेट ही शेरे जमिन असून चिंदर येथील परूळेकर कुटूंबियांच्या खासगी मालकीची आहे. पुर्वी पावसाळ्या अगोदर या बेटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परूळेकर कुटुंब सोडणे, झावळ्या टाकून पुराच्या पाण्यापासून बेटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करायचे. यामुळे या बेटाला धोका नव्हता. पण या बेटानजिक वाळू उत्खनन सुरू झाल्यापासून या बेटाला धोका निर्माण झाला आहे. या अर्निंबंध वाळू उत्खननामुळे परूळेकर बेट ढासळू लागले आहे. या बेटावरील माडाची झाडे खाडीत पडू लागली आहेत. वाळू उत्खनन असेच सुरू राहिल्यास भविष्यात हे बेट नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या परूळेकर कुटुंबातील जयप्रकाश परूळेकर, किशोर परूळेकर, नाना परूळेकर, अशोक पांगे, आदित्य पांगे, प्रकाश परूळेकर यांनी शनिवारी सायंकाळी मुदत संपूनही वाळू उत्खनन सुरू असलेल्या बांदिवडे येथील वाळू उत्खनन रॅम्पवर धडक देत ठेकेदाराला समज दिली.
यावेळी अशोक पांगे यांनी सांगितले की, बांदिवडे मसुरे पुलापासून साधारण पाचशे मीटरच्या पुढे वाळू उत्खनन होणे गरजेचे असताना पाचशे मीटरच्या आतच वाळू उत्खनन केले जात असल्याने वाळू उत्खनन झालेल्या भागात पुलानजिकची वाळू वाहून येवून पुल खचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

7

4