नराधम पित्याला अटक : आईसह मुलीची पोलिसांत धाव
कणकवली, ता. 12 : मद्याच्या धुंदीत स्वतःच्या पंधरा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणार्या पित्याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. या घृणास्पद प्रकारानंतर पीडित मुलीसह आईने कणकवली पोलिसांत धाव घेऊन सर्व वस्तुस्थिती कथन केली. त्यानंतर त्या नराधम पित्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान बापावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा 45 वर्षीय पिता हा मोलमजूरी करतो. त्याला दोन मुली आहेत. मद्याच्या नशेत तो गेले काही दिवस आपल्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करत होता. तसाच प्रकार पुन्हा झाल्यानंतर बापाच्या अत्याचाराला कंटाळलेल्या 15 वर्षीय मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. तर याबाबतचा जाब विचारल्यानंतर त्या पित्याने पत्नी आणि मुलीसोबत भांडण सुरू केले. त्यामुळे त्या नराधम पित्याला अद्दल घडविण्यासाठी पीडित मुलगी आईसह कणकवली पोलिस ठाण्यात आली. त्या मुलीने सर्व प्रकार पोलिस अधिकार्यांना सांगितला. त्यानंतर विनयभंग आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या संशयित नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.