शॉर्टसर्किटमुळे प्रकार: धुर आणि आगीमुळे नागरिकांची पळापळ
सावंतवाडी, ता. १३: येथील मोती तलावाच्या परिसरात पालिकेकडून लावण्यात आलेल्या दिव्यांचे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे परिसरात धूरच धूर निर्माण निर्माण झाला. अचानक धूर आणि आग दिसल्यामुळे परिसरात काठावर बसलेल्या नागरिकांची पळापळ झाली.
हा प्रकार काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. या प्रकाराबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी त्या ठीकाणी धाव घेतली व पालिकेला झालेल्या प्रकाराची कल्पना दिली. रात्री उशिरा पालिकेचे कर्मचारी प्रदीप सावरवाडकर व निलेश तळवडेकर यांनी त्या ठीकाणी येवून विद्युत पुरवठा खंडीत केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, प्रसाद कोरगावकर, अखिलेश कोरगावकर यांनी त्या ठिकाणी धाव घेत परिसरातील नागरिकांना जागरुक केले.
या प्रकारावर विरोधी गटाचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी नाराजी व्यक्त केली असून काठावर लावण्यात आलेल्या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी त्या बदलण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.