वीज वितरण कंपनीकडून वाटलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे

115
2

बांद्यातील ग्रामस्थांचा आरोप : अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

सावंतवाडी, ता.१३ : वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून एका खाजगी ठेकेदाराकडून ग्रामीण भागात वाटप करण्यात आलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे एक वर्षाची गॅरंटी असतानासुद्धा ते बदलून दिले जात नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. याबाबतची बांदा येथील ग्राहक हनुमंत गडद यांनी सावंतवाडी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. मात्र ती कंपनी आमच्याशी संबंधित नाही, तुम्ही त्यांना विचारा असे सांगुन कुलकर्णी यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे श्री. गडद यांनी आक्रमक भूमिका घेत या विरोधात आपण ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशारा दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार आपण चार महिन्यापूर्वी हे एलईडी बल्ब बांदा येथील एका केंद्रावरून खरेदी केले होते. त्याच्या बदल्यात दर महिन्याला आपल्या मासिक बिलातून रक्कम वजा होते. परंतु बल्ब घेतल्यानंतर ते दुसऱ्या महिन्यातच बंद पडले. त्याला एक वर्षाची गॅरंटी आहे. मात्र संबंधित केंद्रातील व्यक्ती आपला काही संबंध नाही असे सांगून या ठिकाणी पाठवतो. अधिकारी ऐकत नाही, त्यामुळे करायचे काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी हा विभाग आपल्याशी संबंधित नाही, बल्बची विक्री बाहेरून झाली आहे. जास्तीत जास्त आम्ही तुमची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो असे सांगून कुलकर्णी यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गडद यांनी केला आहे.

4