वनविभागाची कारवाई : अतिक्रमण व पार्किंगच्या विषयावरून घेतला निर्णय
सावंतवाडी, ता. 13 : आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याच्या ठिकाणी असलेले सुमारे 25 ते 30 स्टॉल वनविभागाच्यावतीने पुन्हा एकदा काढून टाकण्यात आलेले आहेत.
वनविभागाच्या जागेत अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न या दोन मुदद्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते; मात्र दुसरीकडे वर्षा पर्यटनाच्या तोंडावर कारवाई करून सुध्दा संबंधित स्टॉलधारक गप्प आहेत. या कारवाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
आंबोली धबधब्याच्या परिसरात आंबोली, देवसू, दाणोली आदी भागातील काही स्थानिक लोकांनी स्टॉल घातले होते. या स्टॉलची संख्या वीस ते पंचवीस असली तरी त्या ठिकाणी आठ ते दहाजण लोक व्यवसाय करत होते. तर काहींनी त्या ठिकाणी जमीन बळकावून अन्य लोकांना स्टॉल चालवण्यासाठी दिले होते, असे वनविभाग अधिका-यांचे म्हणणे आहे.
दरम्यानच्या काळात या स्टॉल धारकांची हेकेखोरी वाढल्याचे चित्र होते. त्यामुळे परिसरात येणाऱ्या पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. हेच कारण पुढे करून वनविभागाकडून पुन्हा एकदा स्टॉल पाडण्यात आले होते. तत्पूर्वी ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पाडलेले स्टॉल पुन्हा दोन दिवसात संबंधित स्टॉलधारकांनी उभे केले होते. आता ही कारवाई पुन्हा झाली आहे. 48 तास उलटून सुद्धा संबंधित स्टॉल व्यवसायिक गप्प आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर आंदोलन करून पुन्हा स्टॉल उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. परंतु दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदा दाखवून काही झाले तरी आम्ही स्टॉल पुन्हा बांधून देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे वादात वनविभाग माघार घेतो की स्टॉलधारक माघार घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.