Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याप्रलंबित दाखले, तलाठी प्रश्नी आमदारांकडून महसुलचे अधिकारी फैलावर...

प्रलंबित दाखले, तलाठी प्रश्नी आमदारांकडून महसुलचे अधिकारी फैलावर…

आमदारांच्या दणक्यानंतर तलाठी हजर ; सेतूच्या ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश…

मालवण, ता. १३ : तलाठी तसेच प्रलंबित दाखले याप्रश्नी आज आमदार वैभव नाईक यांनी महसुलच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दाखले वेळेत मिळत नसल्याने त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना खडसावले. तलाठी प्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर व्ही. एन. पास्ते यांना तत्काळ तलाठी कार्यालयात हजर होण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. सेतू सुविधा केंद्रातून वेळेवर दाखले होत नसल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी नायब तहसीलदारांना दिल्या.
मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार नाईक यांनी येथील तहसील कार्यालयास भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, रवी तळाशिलकर, नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, संदेश तळगावकर, गौरव वेर्लेकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे, निवासी नायब तहसीलदार सुहास खडपकर हे रजेवर गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडून पदभार दिला न गेल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नसून अन्य कामे खोळंबली असल्याचे आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शहरास कायमस्वरूपी तलाठी नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. यावर आमदार नाईक यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून तहसीलदार, नायब तहसीलदारांनी पदभार अन्य व्यक्तीकडे न दिल्याने तसेच शहरास कायमस्वरूपी तलाठी नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर नायब तहसीलदारांनी चिंदर येथील तलाठी व्ही. एन. पास्ते यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. आमदारांच्या दणक्यानंतर अखेर मालवण तलाठी कार्यालयात व्ही. एन. पास्ते हे हजर झाले.
विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी तसेच पालकांना गेले महिनाभर सातत्याने फेर्‍या माराव्या लागत आहे. विहित मुदतीत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यासह, पालकांनाही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावेळी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या पालकांनी दाखल्यांच्या स्लिपसह आमदार नाईक यांचे लक्ष वेधले. सेतू सुविधा केंद्रात गेल्या दोन महिन्यातील सुमारे तीनशेहून अधिक दाखले प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. सेतू सुविधा केंद्रातील कामगारांची संख्या गेल्या महिन्यापासून कमी करण्यात आली असून केवळ दोनच कॉम्प्युटर असल्याने विलंब होत असल्याचे सेतू सुविधा केंद्रातील कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले. यावर आमदार नाईक यांनी जर संबंधित ठेकेदाराला काम करायचे नसेल तर त्याला ठेका सोडून द्यायला सांगा असे सांगत संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी नायब तहसीलदारांना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments