देवबाग बंधारा दुरुस्तीच्या कामाचा वेग वाढवा : आम. नाईक यांच्या पतनच्या अधिकाऱ्यांना सूचना…

2

 

बंधारा दुरुस्तीची अन्य तीन कामे प्रस्तावित ; जिओ ट्युबसाठी निविदा प्रक्रिया सुरू…

मालवण, ता. १३ : तालुक्यातील देवबाग किनारपट्टीवरील बंधारा दुरुस्तीच्या कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. पतन विभागाच्यावतीने किनारपट्टीवर मोठे दगडही टाकण्यात आले आहेत. सध्या धीम्यागतीने काम सुरू असून त्याचा वेग वाढवा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी आज पतन विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.
समुद्री लाटांच्या जोरदार तडाख्यात देवबाग किनारपट्टीवरील जुना बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. परिणामी लाटांचे पाणी थेट वस्तीत घुसल्याने अनेक ग्रामस्थांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर आज आमदार वैभव नाईक यांनी देवबाग किनारपट्टीची पाहणी करत ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पतन विभागाचे अधिकारी प्रमोद मोडक, ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर, देवबाग पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, उपसरपंच तमास फर्नांडिस, तपस्वी मयेकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, अनिल केळुसकर, सदस्य फिलसू फर्नांडिस, मकरंद चोपडेकर, अक्षय वालावलकर, चंदू खोबरेकर, संदेश तळगावकर, राजू मेस्त्री, भिवा कोळंबकर, अक्षय रेवंडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
देवबाग मोबार येथे ६५ लाख रुपये मंजूर निधीतून ११ मीटर रुंद व १८० मीटर लांबीच्या बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे काम उशिरा सुरू झाल्याचे पतन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. देवबाग विठ्ठल मंदिर मालंडकर घर, सायबा हॉटेल जवळ, फँटसी हॉटेल जवळ ६५ लाख रुपये निधीतून १३० मीटर लांब बंधारा दुरुस्ती प्रस्तावित आहे. समुद्रात जिओ ट्यूब टाकण्यासाठी २ कोटी ४५ लाख निधीची निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पतन विभागाचे अधिकारी श्री. मोडक यांनी दिली.
देवबाग किनारपट्टीवर धडकणार्‍या मोठ्या लाटांची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे उभारण्यात येणार्‍या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी २०० ते ३०० किलोचा काळा दगड वापरला जात आहे. जेणेकरून लाटांच्या तडाख्यात बंधार्‍यास धक्का लागणार नाही असे पतन अधिकार्‍यांनी सांगितले.
पूर्वी बंधारा उभारणीची कामे बंदर विभागाकडे होती. गेल्या काही वर्षात ही कामे पतन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी कामे व निधी मंजूर होण्यासाठी पूर्वी प्रमाणे गती मिळाली नाही. तरी अति आवश्यक ठिकाणी दुरुस्ती कामे मंजूर झाली आहेत. जिओ ट्यूब साठीही निधी मंजूर आहे. संपूर्ण देवबाग किनारपट्टीवर नव्याने बंधारा उभारणीसाठी २२५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शासन स्तरावर मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

4