शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून महावितरणचे अधिकारी फैलावर…

253
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आम. नाईक यांच्याकडूनही नाराजी ; आठ दिवसात समस्या दूर करण्याचे आश्वासन…

मालवण, ता. १४ : शहरात कोसळलेल्या मॉन्सूनपूर्व पावसात वीज पुरवठ्याच्या अनागोंदी कारभार उघड झाला. तहसील, पोलिस ठाण्यासह अनेक नागरिकांनी तीन-चार दिवस अंधारात राहावे लागले. त्यामुळे नागरिकांच्या रोषास पालिकेतील सत्ताधार्‍यांना, लोकप्रतिनिधींना सामोरे जावे आहे. त्यामुळे आज येथे आलेल्या आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीतच शिवसेना पदाधिकार्‍यांनी महा वितरणच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले.
दरम्यान महा वितरणच्या अधिकार्‍यांनी येत्या आठ दिवसात समस्या दूर केल्या जातील असे आश्‍वासन आमदार, लोकप्रतिनिधींना दिले. यावेळी आमदार नाईक यांनी महावितरणला जी मशिनरी गरजेची आहे ती उपलब्ध करून दिले जाईल असे स्पष्ट केले.
आमदार नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्यासमवेत शहरातील वीज पुरवठ्याच्या समस्येसंदर्भात बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, सुनीता जाधव, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, रवी तळाशिलकर, शहरप्रमुख बाबी जोगी, किसन मांजरेकर, तपस्वी मयेकर, भाई ढोके, संदेश तळगावकर, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मेढ्यातील नागरिक गेले चार दिवस अंधारात होते. नागरिकांनी तक्रारी देऊनही त्याची कार्यवाही झाली नाही. देऊळवाडा येथील मुख्य कार्यालयात फोन केल्यास तो उचलण्यास कर्मचारी नाही. अधिकारी नाही. परिणामी नागरिकांच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात महावितरणने आपल्या कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला.
अधीक्षक अभियंत्यांनी दोन नवीन कर्मचारी उपलब्ध करून दिला जाईल. देऊळवाडा येथील कार्यालयात आवश्यक कर्मचारी उपलब्ध आहे. शिवाय गरजेनुसार साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी काही कालावधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी महावितरणने ही सर्व कामे करणे गरजेचे होते. याची कार्यवाही महावितरणने न केल्यानेच आज लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची नाराजी सहन करावी लागत आहे. महावितरणला काही साहित्य तसेच निधीची आवश्यकता असल्यास त्याची माहिती द्या असे आमदार नाईक यांनी सांगितले.
महावितरणकडून तहसीलदार कार्यालयाकडे टाकण्यात आलेली केबल लाईन पालिकेकडून गटार बांधण्याच्या वेळी जळाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. तेथे दुसर्‍यांदा नवीन वीज वाहिनी घातली तीही जळाल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. सध्या भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकर मार्गी लावले जाईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

\