अतिउत्साही पर्यटकांना आवरायचे कसे?

282
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

  • पोलिसांकडून पर्यटकांना समज ; तरीही पर्यटकांकडून दुर्लक्ष…

मालवण, ता. १४ : खवळलेल्या समुद्री लाटांचे पाणी अंगावर घेण्यास तसेच सेल्फी काढण्यासाठी काही अतिउत्साही पर्यटक रॉकगार्डन लगतच्या खडकाळ भागात जात आहेत. आज सायंकाळी लाटांचे पाणी अंगावर घेण्याबरोबर, सेल्फी काढण्यास पुढे गेलेल्या पर्यटकांना अखेर महिला पोलिस कर्मचार्‍यांनी चांगलेच सुनावत तेथून परतावले. त्यामुळे या अतिउत्साही पर्यटकांना आवरणार कसे? असा प्रश्‍न पडला आहे.

गेले काही दिवस समुद्र खवळलेला आहे. समुद्राच्या अजस्र लाटा किनार्‍यावर धडकत आहेत. समुद्राच्या लाटांचे पाणी अंगावर घेण्यास पर्यटक आकर्षित होत आहेत. दोन दिवसांपूर्वी रॉकगार्डन लगतच्या खडकाळ भागात एक प्रेमी युगुल लाटांच्या तडाख्यात अडकले होते. मात्र घटनास्थळी पोलिस तत्काळ दाखल झाल्याने सुर्देवाने मोठी दुर्घटना टळली.
पर्यटन हंगाम संपला असला तरी सध्या रॉकगार्डनमध्ये पर्यटक येत आहेत. या गार्डन नजीकच्या खडकाळ भागात लाटा उसळत आहेत. या लाटांचे पाणी अंगावर घेण्यास तसेच सेल्फी काढण्यास पर्यटकांना मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. यात आज सायंकाळी काही अतिउत्साही पर्यटक रॉकगार्डन लगतच्या खडकाळ भागात समुद्री लाटांचे पाणी अंगावर घेण्याबरोबरच सेल्फी काढण्यास गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन, पोलिस कर्मचारी पुजाली निकम, नमिता ओरसकर यांनी रॉकगार्डनच्या ठिकाणी जात या अतिउत्साही पर्यटकांना चांगलीच समज देत माघारी रॉकगार्डनमध्ये आणले. मात्र सायंकाळी उशिरा पुन्हा काही पर्यटक समुद्री लाटांच्या ठिकाणी जात सेल्फी घेत असल्याचे दिसून आले. पर्यटकांना खडकाळ भागात न जाण्याच्या सूचना देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या अतिउत्साही पर्यटकांना आवरायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

\