दिखाऊ आढावा बैठक नको ; अशोक सावंत
मालवण, ता. १४ : उन्हाळ्यात कमी दाबाचा वीज पुरवठा आणि पावसाळ्यात सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे शहरातील वीज ग्राहक, व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. गेली काही वर्षे सातत्याने या समस्या निर्माण होत असताना त्या सोडवण्यात महावितरणला अपयश आले आहे. कार्यान्वित न झालेल्या मालवण वीज उपकेंद्राचे उदघाटन करून आमदार, खासदार व महावितरणने जनतेची फसवणूक केली आहे. असे सांगत स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी
महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले असून वीज वाहिन्या तुटल्या आहेत. अनेक गावे अंधारात असून काही गावात चार दिवस वीज पुरवठा बंद आहे. दुरुस्तीसाठी पुरेसे कर्मचारी नाही ही महावितरणची स्थिती असताना आढावा बैठकीचा दिखावा कशासाठी ? असा संतप्त सवाल उपस्थित करत तत्काळ वीज समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिला.
मालवण येथील वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता संजय गवळी व मालवण वीज अधिकारी यांची आढावा बैठक महावितरणच्या कार्यालयात झाली. या बैठकीनंतर अशोक सावंत यांनी कुंभारमाठ येथील वीज उपकेंद्र येथे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता संजय गवळी यांची भेट घेत तालुक्यातील वीज समस्या मांडल्या. यावेळी छोटू सावजी, रवी टेंबुलकर उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी जीर्ण वीज खांब बदलणे, वीज तारांवरील झाडे तोडणी गरजेची असताना मेंटेनन्सची कामे होत नाही. वीज समस्यांचा आढावा पावसाळ्यापूर्वी घेतला जात नाही. वीज खांब नाहीत, साहित्य नाही, कर्मचारी नाही ही कारणे नेहमीचीच झाली आहेत. या कारभाराचा फटका जनतेला बसत आहे. आज अनेक गावे अंधारात आहेत. शहरासह अनेक ठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. जनता व व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. तरी खंडित वीजपुरवठा सुरू करत वीज समस्या तत्काळ सोडवा अशी आक्रमक भूमिका सावंत यांनी घेतली. दरम्यान पाटील यांनी लवकरात लवकर खंडित वीजपुरवठा सुरू केला जाईल असे स्पष्ट केले.
मालवणात नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार, खासदार यांच्याकडून मोठ्या थाटात उदघाटन झाले. मात्र उदघाटनानंतर वीज उपकेंद्र बंदच आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्याकडून जनतेची फसवणूक झाली असल्याचा आरोपही श्री. सावंत यांनी केला.