कुंभारमाठमध्ये एका घरात अवैध सेंद्रिय खताचा साठा…

2

कोल्हापूर येथील कंपनीच्या दोन प्रतिनिधी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल…

मालवण, ता. १५ : कुंभारमाठ येथील एका घरामध्ये सेंद्रिय खताचा अवैध साठा केल्याप्रकरणी ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या दोन प्रतिनिधींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक प्रदीप ओहोळ रा. कुडाळ यांनी काल रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दिली.
     कृषी अधीक्षक श्री. ओहोळ हे डमी ग्राहक बनून ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या ज्ञानेश्‍वर सोपान खंडागळे, अविनाश राजेंद्र सरवदे दोन्ही रा. कुंभारमाठ यांच्याकडे गेले. त्यांनी खताची मागणी करत दोनशे रुपये ऍडव्हान्स दिले. दुसर्‍या दिवशी ८७ हजार रुपयांचे खत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. काल श्री. ओहोळ हे खत आणण्यास कुंभारमाठ येथे गेले असता त्यांना तेथील एका घरात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा साठा केल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी अवैध साठ्याच्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी केलेल्या पाहणीत ९५२० किलोचे सेंद्रिय खत सापडले.  या खताचे नमुने घेत त्यांनी ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.
     सेंद्रिय खताचा साठा करण्यासाठी गोडाऊनची आवश्यकता असते. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. मात्र याची कोणतीही कार्यवाही न करता एका घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा आढळला. त्यामुळे श्री. ओहोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर खंडागळे, अविनाश सरवदे या दोघांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर हे अधिक तपास करत आहेत.
4