जमाव पांगला : चालकावर कठोर कारवाईची मागणी
पणजी, ता. १६ : बार्देश येथील चोपडे-शिवाजी पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी कल्याण मुंबई येथील शेखर दुबे याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला होता. स्विफ्ट कार आणि फॉर्च्यूनर यांच्यात समोरासमोर धडक झाल्यामुळे या अपघातात दोघेजण जागीच मरण पावले होते. जुआंव फर्नांडिस (वय ६२), जुडास फर्नांडिस (वय २५)अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले आहे.
हे कुटुंबीय आपल्या कारमधून शिवोलीम चर्चमध्ये फेस्तसाठी जात होते. मात्र समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुबे यांच्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या स्विफ्ट कारला धडक दिली. यात दोघेजण जागीच ठार झाले. हा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या संतप्त नागरिकांनी दुबे यांची कार पेटवून दिली. त्याच्यासोबत असलेल्या अन्य चौघांना तात्काळ अटक करा अशी पोलिसांकडे मागणी केली. गाडीतून प्रवास करणारे पाचहीजण ड्रग्सच्या नशेत होते, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी, म्हापसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक आदींनी घटनास्थळी भेट दिली.