सिंधुदुर्गातील डॉक्टरांचा सोमवारी बंद

2

बाह्य रूग्ण तपासणी बंद राहणार : डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

कणकवली, ता. १६ : पश्‍चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण देशातील डॉक्टरांनी बंद पाळला. त्याचधर्तीवर सोमवारी (ता. १७) सिंधुदुर्गातील सर्व डॉक्टर बंद पाळणार आहेत. यात सर्व खासगी रुग्णालयातील बाह्य रूग्ण तपासणी बंद राहणार आहे. केवळ आपत्कालीन उपचार आणि प्रसूती या बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर उदया सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन देखील निवेदन देणार आहेत.
येथील संजीवनी रुग्णालयात डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लबची पत्रकार परिषद झाली. यात जिल्हाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे यांनी प्रतिकात्मक संपाबाबतची माहिती दिली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबाळे, सचिव डॉ. सुहास पावसकर, सल्लागार डॉ. अनंत नागवेकर,  डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. गीता मोघे,  डॉ. शमिता बिरमोळे आदी उपस्थित होते.
डॉ. पाताडे यांनी रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पण दुदैवाने रूग्णाचा मृत्यू झाला तर नातेवाईक डॉक्टरांवर हल्ला करतात ही घटना अतिशय निषेधार्ह आहे. अशा घटनांमधून डॉक्टरांबाबत गैरसमज पसरवले जातात. तर अशा घटना रोखण्यासाठी शासनाकडून कार्यवाही होत नसल्याने डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठीच सिंधुदुर्गातील सर्व खासगी डॉक्टर उद्या एक दिवसाचा बंद पाळणार आहेत. या बंदमध्ये खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी, दातांचे दवाखाने बंद राहणार आहेत. तर दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना संघटनेच्यावतीने निवेदनही देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
4