सावंतवाडी-चितारआळीतील जुनी पोलीस चौकी पुन्हा सुरु करा

2

संजू शिरोडकर : गृह राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधूनही कार्यवाही नाही

सावंतवाडी, ता. १६ : वाढत्या चो-यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहरातील चितारआळी परिसरात असलेली जुनी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजपचे शहरअध्यक्ष संजू शिरोडकर यांनी केली आहे. या मागणीकडे गेल्या काही महिन्यापूर्वी आपण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. मात्र काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तात्काळ विचार न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, चितारआळी परिसरात जुनी पोलीस चौकी होती. परंतु ती इमारत जुनी झाल्याचे कारण सांगून तेथील पोलीस चौकी बंद करून इमारत निर्लेखित करण्यात आली; मात्र आता शहर वाढते आहे. त्यामुळे बाजार परिसरात येणाऱ्या लोकांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, शहरातून सुरक्षिततेचे काम हाकणे सोयीचे व्हावे यासाठी ती पोलीस चौकी पुन्हा उभारणे गरजेचे आहे. तशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याबाबत गृह राज्यमंत्री केसरकर यांच्याकडे आपण मागणी केली होती. परंतु कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अन्यथा भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

4