पोलिसात तक्रार नाही : स्थानिक युवती कर्मचार्याला फसविल्याचा आरोप
सावंतवाडी, ता. १६ : शहरात वादग्रस्त ठरलेल्या एका मेडिकलच्या मॅनेजरला आज एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने मारहाण केली. एका स्थानिक युवतीला कामावर नेमणूक देवूनसुद्धा त्या ठिकाणी आयत्यावेळी दुसरा कर्मचारी नियुक्त केल्यामुळे हा प्रकार घडला. यावेळी त्या ठिकाणी पोलिसही दाखल झाले. मात्र संबंधित मॅनेजरने माफी मागितल्यामुळे हा प्रकार मिटविण्यात आला. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. संबंधित मेडिकल हे काही महिन्यापूर्वी या ठिकाणी उघडले आहे. स्थानिक मेडिकल चालकांनी त्याला विरोध केल्यामुळे ते वादात सापडले होते. यात संबंधित युवतीला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 1 जानेवारीपासून कामावर रुजू होण्यास सांगितले होते. मात्र संबंधित युवतीचे ओरिजनल कागदपत्र नसल्यामुळे तिला कागदपत्र जमा करण्यास वेळ लागला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्या जागेवर एका परप्रांतीय कर्मचार्याची भरती करण्यात आली. याबाबत त्या युवतीला काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्या युवतीने मराठीचा मुद्दा उपस्थित करणार्या एका राजकीय पक्षाला याबाबतची माहिती दिली. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जात जाब विचारला. परंतू तेथील परप्रांतीय मॅनेजरने उद्धट उत्तरे दिल्यामुळे कार्यकर्ते संतापले व त्यांनी त्या मॅनेजरला चोप दिला. काही वेळाने पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.