माजी खासदार निलेश राणे यांची कॅबिनेट मंत्री सावंत यांच्यावर टीका
कणकवली, ता. 16 : मी भिकारी होणार नाही, तर महाराष्ट्राला भिकारी बनवेन अशी भाषा करणार्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळते यापेक्षा दुर्दैव ते काय अशी टीका माजी खासदार तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रीमंडळात 13 युतीच्या नेत्यांनी शपथ घेतली. यात शिवसेना आमदार सावंत यांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान सव्वाशे-दिडशे कोटीचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झाला की काय ? पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन. पण तानाजी सावंत कधी भिकारी होणार नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून मोठा वादंग झाला होता. या विषयावरून श्री. राणे यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.