कॅमेर्याची बॅग केली परत : ब्रेकींग मालवणीच्या वृत्ताने बॅग सापडली
सावंतवाडी, ता. १६ : शिल्पग्राम परिसरात पडलेली कॅमेर्याची बॅग व साहित्य मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांनी संबंधित युवकांना परत दिली. त्यांना ती परिसरात वाटेत पडलेली आढळून आली होती. दरम्यान आपली बॅग मिळाल्यानंतर संबंधित युवकांनी श्री. सुभेदार यांच्यासह पोलिसांचे आभार मानले.
येथील शिल्पग्राम परिसरात फोटोशुटसाठी गेलेल्या तिघा युवकांची कॅमेर्याची बॅग हरवली होती. त्यांनी याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेवून अर्ज दिला होता. त्यात 15 हजार रुपयांच्या लेन्ससह अन्य कॅमेर्याचे साहित्य होते. दरम्यान ती बॅग श्री. सुभेदार यांना वाटेत आढळून आली. त्यांनी ती आपल्याकडे ठेवली. याबाबतचे वृत्त ब्रेकींग मालवणीमध्ये प्रसिद्ध होताच त्यांनी कार्यालयात संपर्क साधून आपल्याकडे बॅग असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ती बॅग परत करण्यात आली. यावेळी संबंधित युवकांनी ब्रेकींग मालवणीसह ठाणे अंमलदार बाबू तेली व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोते यांचे आभार मानले.