अन्यथा कार्यालयावर मोर्चा काढू : नगरसेवक यतीन खोत
मालवण, ता. १७ : मालवण शहरातील स्ट्रीटलाईट बंद असल्याने संपूर्ण शहर सध्या अंधारात गेले आहे. धोकादायक विद्युत पोल, पोलावरील झाडी यासारखी कामे अद्यापही न झाल्याने महावितरणचा अनागोंदी चव्हाट्यावर आला आहे. वीज पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यास आवश्यक कर्मचारी नसल्याने सर्वांचे हाल होत आहे. या समस्या तत्काळ न सोडविल्यास महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा स्वाभीमानचे नगरसेवक यतीन खोत यांनी दिला आहे.
पावसाळा सुरू झाला तरी महावितरणने धोकादायक विद्युत पोल बदलणे, जुनाट वाहिन्या बदलणे, झाडी हटविणे यासारखी कामे अद्यापही केलेली नाहीत. शहरातील स्ट्रीटलाईट बंदावस्थेत असल्याने संपूर्ण शहर अंधारात गेले आहे. परिणामी नागरिकांच्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहेत. महावितरणकडून स्ट्रीटलाईटच्या दुरुस्तीच्या कामास कर्मचारी उपलब्ध करून दिले जात नसल्याने ही कामे स्थानिक नगरसेवकांना स्वखर्चातून करावी लागत आहेत. स्ट्रीटलाईटच्या वाहिन्यांवरील त्रुटी दूर करून दिल्या तरी त्या सुरू करण्याचे काम महावितरणकडून केले जात नाही. खासगी कामगारांकडून दुरुस्तीची कामे करून घेतली जात असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न श्री. खोत यांनी उपस्थित केला आहे.
वीज पुरवठ्याच्या समस्येसंदर्भात महावितरणच्या कार्यालयात फोन केल्यास तो उचलण्यास माणसे नाहीत. पावसाळ्यापूर्वीच महावितरणची अशी अवस्था असेल तर पावसाळ्यात नागरिकांना महावितरण काय सुविधा देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहरात विविध भागात धोकादायक विद्युत पोल असून पावसाळ्यापूर्वी ते बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने येत्या पाच-सहा दिवसात याची कार्यवाही न केल्यास महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा श्री. खोत यांनी दिला आहे.