टॉवरची क्षमता नसल्याचे कारण पुढे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एकतर्फी निर्णय
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.१७: राज्यात मोठया प्रमाणात रेव्हॅन्यू उपलब्ध करुन देणार्या सिधुदूर्ग जिल्ह्याला बीएसएनएलने “फोर जी” सेवेतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारणे खर्चिक असल्याचे कारण दाखवून वरिष्ठ स्तरावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.याबाबत सावंतवाडीतील जिल्हा प्रबंधक अंबादास होन यांनी दुजोरा दिला असून या ठीकाणी टॉवरची क्षमता नाही मात्र लोकांची मागणी लक्षात घेता पुढच्या काळात ही सेवा जिल्हयात राबविणे गरजेचे आहे,असा प्रस्ताव वरिष्ट स्तरावर देण्यात आला आहे,असे त्यांच्याकडुन सांगण्यात आले .
मिळालेल्या माहीतीनुसार राज्यात गडचिरोली ठाणे नागपुर,नांदेड,बीड.भंडारा,बुलढाणा,उस्मानाबाद,लातूर आदी जिल्ह्यात “फोर जी” जी सेवा सुरू करण्यात आली आहे.मात्र या सेवेतून सिधुदूर्ग जिल्ह्याला वगळण्यात आले आहे.दरम्यान याबाबत अधिक माहीती घेतली असता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत त्यांच्यासाठी टू जी सेवा सुरू आहे.विशेषतः ग्रामीण भागात ही सेवा देत आहोत.शहराच्या ठीकाणी थ्रीजी सेवा सुरू आहे मात्र आता या जिल्ह्यात लोकांना तुर्तास तरी सेवा देणे शक्य होणार नाही त्यासाठी आवश्यक असलेली स्पेक्ट्रम पॉवर आमच्याकडे उपलब्ध नाही,असे होन यांनी यावेळी सांगितले.