Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आमदारांची श्रेयासाठी धडपड... आरोग्य यंत्रणाही व्हेंटिलेटरवर ;...

मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आमदारांची श्रेयासाठी धडपड… आरोग्य यंत्रणाही व्हेंटिलेटरवर ; मंदार केणी यांची टीका…

मालवण, ता. १७ : तालुक्यातील सर्वसामान्य जनता सत्ताधार्‍यांच्या अपयशी कारभारामुळे अनेक समस्यांनी त्रस्त आहे. जनतेच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आमदार वैभव नाईक केवळ श्रेयासाठी धडपडताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यात महावितरण, दूरध्वनी सेवेचा आढावा न घेतल्यामुळेच पहिल्याच पावसात वीज, दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडाला. त्यामुळे याला सर्वस्वी आमदार नाईकच जबाबदार असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान तालुक्याची आरोग्य यंत्रणाही विस्कळित असून शवविच्छेदन गृहात मृतदेह ठेवण्यासाठी लागणारी शितशवपेटी बंदावस्थेत आहे. त्यामुळे खासगी शितशवपेटीचा आधार घेऊन मृतदेह ठेवावे लागत आहेत. आरोग्य यंत्रणेकडेही दुर्लक्ष करणार्‍या सत्ताधार्‍यांकडून अपयशी कारभाराची मालिका सुरूच राहिल्याचा टोला त्यांनी लगावला.
श्री. केणी म्हणाले, सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर वचक नसल्याने शैक्षणिक दाखले, महावितरण, दूरध्वनी सेवा पूर्णतः विस्कळित झाली आहे. शहरात अद्याप तलाठी कार्यरत झाले नसताना आमदार नाईक हे तलाठी आणण्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत तर दुसरीकडे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रही ठेकेदाराविना समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. आमदार नाईक यांनी तहसीलदार सुटीवर असताना तहसील कार्यालयात जाऊन अन्य अधिकार्‍यांना फैलावर घेतल्याचा देखावा केला आहे.
पावसाळ्यात नेहमीच महावितरणचा कारभार चव्हाट्यावर येतो. त्यासाठी आमदार नाईक यांनी एप्रिल महिन्यात दक्षता समितीची बैठक घेऊन महावितरण, दूरसंचार विभागांना खबरदारीच्या सूचना करणे गरजेचे होते. मात्र नाईक यांनी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही उपाययोजना न केल्याने वीज पुरवठ्यासह दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडाला आहे. महावितरणकडे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारे विद्युत पोल उपलब्ध नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक घरांमधील वीज पुरवठा गायब झाला असून तो अद्याप पूर्ववत झालेला नाही. शहरातीलही पथदिवे बंदावस्थेत असून आमदार वैभव नाईक केवळ तलाठी आणल्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याची टीका श्री. केणी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments