डॉक्टर हल्याविरोधात केंद्राने कडक कायदा आणावा

2

जिल्ह्यातील डॉक्टरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रुग्णसेवा बंदला १०० टक्के प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये एन आर एस रुग्नालयातील डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबच्यावतीने सोमवारी तात्काळ वगळता रुग्णसेवा बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देत केंद्र सरकारने डॉक्टरवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा. त्यात कडक शिक्षेची तरतूद करून त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर उपस्थित होते. यात अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे, उपाध्यक्ष राजेश्वर उबाळे, सचिव डॉ सुहास पावसकर, सहसचिव डॉ संदीप नाटेकर, खजिनदार डॉ शरदचंद्र काळसेकर, सहखजिनदार डॉ सतीश लिंगायत, सदस्य डॉ संजीव आकेरकर, डॉ गुरुराज कुलकर्णी, डॉ राजेंद्र पारकर, डॉ मिलिंद काळे, डॉ अमृत गावडे, डॉ मयूर मुरकर, डॉ सुखानंद भागवत, डॉ दीपक ठाकूर यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते.
या निवेदनात पश्चिम बंगालमध्ये मारहाण झालेले डॉक्टर आजही मृत्यूशी झुंज देत आहेत. भारतात अतिरिक्त ताण सहन करीत डॉक्टर शक्य तेवढी आरोग्य सेवा देत आहेत. मात्र, हिंसक भावना ठेवणाऱ्या व्यक्तींना वेळीच प्रतिबंध व कठोर शिक्षा न झाल्यास आरोग्य यंत्रनेत अराजकता माजेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब व डी. एफ. सी. या संघटनेने रुग्णसेवा बंद ठेवली आहे. यात सुमारे ६०० नोंदणीकृत डॉक्टर सहभागी झाले असल्याचे, या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ पाताडे यांनी निर्भय वातावरणात आरोग्य सेवा देण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे. तसेच असा हल्ला झाल्यावर तात्काळ सुरक्षा मिळण्यासाठी १००, १०१, १०२ सारखा नंबर जिल्ह्यात सुरु करून एक वेगळी सुरुवात करावी, अशी जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांच्याकडे मागणी केली.

16

4