जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत वाढले ;जी.प.अध्यक्षा सौ सावंत

172
2
Google search engine
Google search engine

माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत मुलींना सेविंग कार्डचे वाटप

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

आजी-आजोबांनी मुलगाच हवा ही मानसिकता बदलल्याने जिल्ह्यात आता मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. हे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांवरून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन करतानाच एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांबरोबरच आता आजी-आजोबांचाही सत्कार पुढील कार्यक्रमात करा, असे आदेश जिप अध्यक्षा संजना सावंत यांनी आजच्या कार्यक्रमात बोलताना दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्यावतीने माझी कन्या भाग्यश्री व बेटी बचाव बेटी पढाओ योजनेंतर्गत बचत प्रमाणपत्र व धनादेश वाटप कार्यक्रम जिप अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिप मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजीत देसाई, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बाल विकास सभापती पल्लवी राऊळ, जिप सदस्य माधुरी बांदेकर, संपदा देसाई, श्वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, वर्षा कुडाळकर, पात्र लाभार्थी आदि उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी श्री. म्हात्रे म्हणाले की, स्त्री जन्माचे स्वागत व्हावे आणि मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. विविध योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून माझी कन्या भाग्यश्री आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबविल्या जात आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रकिया करणाऱ्या कुटुंबातील मुलींच्या नावे बचत प्रमाणपत्र दिले जाते. त्यानुसार चालू वर्षात १७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्या लाभार्थ्याने आज बचत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. शिवाय १० वी व १२ वी च्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ मुलींचा धनादेश देवून सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.