तारकर्ली जेटीवरील अतिक्रमण हटविले…

141
2

तारांकित प्रश्न असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई ; बंदर अधिकाऱ्यांची माहिती

मालवण, ता. १७ : तालुक्यातील तारकर्ली जेटीवर केलेले अतिक्रमण आज बंदर विभागाच्यावतीने पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. या अतिक्रमणात जेटीवर उभारलेले आलेले २१ पोल काढून ते ताब्यात घेण्यात आले. विधानसभेत तारांकित प्रश्‍न असल्याने मेरीटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली.
दरम्यान ही कारवाई सुडाच्या भावनेतून केल्याचा आरोप करत डॉ. जितेंद्र केरकर तसेच मच्छीविक्रेत्या महिलांनी आज दुपारनंतर बंदर विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे.
तारकर्ली येथे मेरीटाईम बोर्डाच्यावतीने लाखो रुपये खर्चून अद्ययावत जेटी बांधण्यात आली होती. मे महिन्यात या जेटीवर अज्ञातांनी खड्डे मारून त्यात पाईप बसविले होते. जेटीवर अतिक्रमण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी बंदर विभागाकडे तक्रार करत जेटीचे नुकसान करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली. त्यानुसार बंदर विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
तारकर्ली जेटीवर अतिक्रमण केल्याचा तारांकित प्रश्‍न विधानसभेत असल्याने हे अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले. त्यानुसार आज बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, कनिष्ठ अभियंता सचिन गायकवाड, सहायक बंदर निरीक्षक यु. आर. महाडिक यांनी पोलिस बंदोबस्तात तारकर्ली जेटीवरील अतिक्रमण हटविले. यात मासळी मंडईसाठी उभारलेले आठ तर अन्य व्यावसायिकांनी उभारलेले तेरा असे एकूण २१ पाईप काढून टाकत ताब्यात घेण्यात आले.
बंदर विभागाकडून केलेली कारवाई ही सूडाच्या भावनेतून झाल्याने याच्या निषेधार्थ बंदर विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे. मच्छीविक्रेत्या महिलांना मंडईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

4