संजय गुप्तांचे आश्वासन ; नव्या गाडीची व्यवस्था: अतुल काळसेकर यांची माहिती
कणकवली, ता.17 ः कोकण रेल्वे मार्गावरील विशेषत: सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील प्रवाशांसाठी एलएचडी कोचच्या नवीन कोकणकन्या व मांडवी एक्स्प्रेस या दोन गाडयांमधील बोगी कमी करण्यात आल्या होत्या. या बोगी ऑगस्ट अखेरपर्यंत वाढवून देणार असल्याचे आश्वासन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांना आज दिले.
बांद्रा, बोरिवली, पनवेलमार्गे मडगांव कायमस्वरुपी गाडी सुरू करण्यात यावी, यासाठी येत्या 10 दिवसात रेल्वे मंत्री पियुष गोयल व मध्य, पश्चिम कोकण रेल्वे अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल अशी माहिती भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज दिली.
बेलापूर येथील कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या कोकण भवन येथे कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग बँक संचालक अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सिंधुदुर्ग रहिवासी संघ अध्यक्ष रवींद्र सामंत, कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी.के.सावंत, रेल्वे प्रवासी संघटना कल्याण, अध्यक्ष सुनील उतेकर, माजी नगरसेवक भाई कवठणकर, महामंत्री बोरिवली विधानसभा शरद साटम, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ बोरिवली अध्यक्ष विजयसिंह मोंडकर यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेलापूर येथे झालेल्या बैठकीत रेल्वे समस्यांबाबत एकूण 12 मागण्या अतुल काळसेकर यांनी झालेल्या बैठकीत रेल्वे प्रशासनाकडे केल्या. त्यामध्ये प्रमुख मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या बैठकीत कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत दोन तास सकारात्मक चर्चा झाली. नव्याने सुुरू करण्यात आलेल्या एलएचडी कोच कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेसमध्ये दोन जनरल डब्यांचे बोगी कमी करण्यात आल्या आहेत. या बोगी ऑगस्ट अखेरपर्यंत जोडण्यात येतील. दोन्ही गाडयांमध्ये बकेटसीट ऐवजी स्लिपर सीट 1 सप्टेंबरपासून जोडण्यात येतील. तुतारी एक्स्प्रेसचे वाढते भारमान लक्षात घेऊन ही केवळ 12 डब्यांची रेल्वे गाडी पुढील काळात 20 ते 22 डब्यांची करण्यात यावी. त्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत कोकण रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर मेंगलोर एक्सप्रेसला फक्त कणकवली थांबा असल्याने कुडाळ-सावंतवाडीतील प्रवाशांना त्याचा लाभ होत नाही. या दोन्ही ठिकाणी थांबा मिळावा. त्यामुळे इतर गाडयांचे भारमान कमी होण्यास मदत होईल. तसेच या मार्गावर सावंतवाडी ते बांद्रा या मार्गावर नव्याने रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी, यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली आहे. रेल्वे प्रश्नी आगामी काळात सातत्याने पाठपुरावा करून कोकणातील प्रवाशांना दिलासा देण्यात येईल. या बैठकीत प्रमुख मागण्यांवर संजय गुप्ता यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.