बांदा नं १ शाळेत झाडांची रोपे देऊन चैतन्यमय विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

2

बांदा :हक्क नव्या पिढीचा प्राथमिक शिक्षण घेण्याचा” एक दोन तीन चार, जिल्हा परिषद शाळा आहे छान छान. “अशा प्रकारच्या घोषणा देत जिल्हा परिषद शाळेतील नवागत विद्यार्थ्यांना कोल्हापूरी फेटे बांधून बैलगाडीतून प्रभातफेरी काढून झाडांची रोपे देऊन चैतन्यमय प्रवेशोत्सव कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले.
उन्हाळी दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे,शाळा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने राबविलेल्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी बांदा नं 1 केंद्रशाळेत करण्यात आली.
या दिवशी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात जि.प.सदस्य श्वेता कोरगावकर ,सरपंच मंदार कल्याणकर ,माजी सरपंच बाळा आकेरकर ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सविता किल्लेदार, विस्तार अधिकारी संदिप गवस, जिल्हा शिक्षण विभाग समन्वयक सुशांत रणदिवे,जेष्ठ नागरिक गुरूनाथ नार्वेकर,अन्वर खान ,तुळशीदास धामापूरकर,ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर,रिया अल्मेडा,मुख्याध्यापक सरोज नाईक,अंगणवाडी मुख्य सेविका आराधना धुपकर निलेश मोरजकर,जय भोसले आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन शालेय परिसरात लागवड करण्यात आली.
या दिवशी पुस्तक दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्ती जीवन संकल्पाची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना देण्यात आली तसेच उत्कर्षा अंतर्गत विद्यार्थ्यांनी व माता पालकांचे श्रीमती अनुराधा धामापूरकर यांनी उद्बोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभेच्छा सावंत तर आभार मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक वृंद रसिका मालवणकर , उर्मिला मोर्ये ,रंगनाथ परब ,जे.डी .पाटील,वंदना शितोळे, जागृती धुरी ,प्राजक्ता मस्के,माता पालक संघ शिक्षक पालक संघ ,जेष्ठ नागरिक संघ व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

3

4