एलईडी, पर्ससीन मासेमारीविरोधात कडक कायदा करण्यासाठी २६ जूनला मंत्रालयात बैठक

222
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता १८ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी व पर्ससीन मच्छीमारीवर कारवाईसाठी कडक कायदा अंमलात आणण्यासंदर्भात २६ जून रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. गृह व मत्स्य खात्याचे मंत्री, सागरी पोलिस प्रमुख, मत्स्य विभागाचे अधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात ही बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
एलईडी व पर्ससीनच्या  अवैधरीत्या सुरू असलेल्या  मासेमारी संदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासमेवत आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक मुंबई येथे घेतली. या बैठकीत एलईडी व पर्ससीन मच्छीमारीवर कारवाईसाठी कडक कायदा अंमलात आणण्यासंदर्भात चर्चा करून २६ जून रोजी गृहराज्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या उपस्थितीतीत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलईडी व पर्ससीन नौकाद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होत असून ही विध्वंसक मासेमारी रोखण्यासाठी यावर शासनाने कडक कायदा अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे अशी भूमिका आमदार नाईक यांनी मांडली. यावेळी रामदास कदम यांनी अवैध मासेमारीवर कडक कायदा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे सांगितले.
यावेळी मत्स्य आयुक्त अरुण विधळे, सह आयुक्त श्री. जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी मिना टेंभूर्णे, मत्स्यव्यवसाय कार्यकारी अभियंता श्री. शिकलगार आदी अधिकारी उपस्थित होते.